Wed, Nov 21, 2018 05:49



होमपेज › Solapur › शिक्षक पतीस जन्मठेपेची शिक्षा

शिक्षक पतीस जन्मठेपेची शिक्षा

Published On: Mar 08 2018 11:00PM | Last Updated: Mar 08 2018 9:33PM



सोलापूर : प्रतिनिधी

हत्तुरे वस्ती येथील पत्नी व सासू यांच्या दुहेरी खून प्रकरणात दोषी धरलेल्या सद्धलिंग पंडित कामोणे (वय 31, रा. मल्लिकार्जुननगर, सोलापूर)शिक्षकासह पाच आरोपींना अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. सावंत-वाघोले यांनी गुरुवारी शिक्षा सुनावली.  

सिद्धलिंग कामोणे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर श्रुती व सारिका या दोघींचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यास प्रत्येकी 10 वर्षे सक्‍तमजुरी व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षा आरोपीने एकापाठोपाठ भोगावयाच्या आहेत. आरोपी श्रीशैल मडिळप्पा बिराजदार (47, रा. माँसाहेब विडी घरकुल, कुंभारी) यास खूनप्रकरणी 10 वर्षे सक्‍तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  पंडित शिवलिंग कामोणे (65), मंगल पंडित कामोणे (55) यांना संगीताचा छळ केल्याप्रकरणी 1 वर्ष सक्‍तमजुरी व प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व आरोपींनी मिळून जखमी श्रुती व सारिका यांना 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. तर कैलाश पंडित कामोणे (40, रा. मल्लिकार्जुननगर, अक्‍कलकोट रोड, सोलापूर) हा अद्यापही फरारी आहे. त्याच्याविरुद्ध त्यास अटक केल्यानंतर खटला चालणार आहे.

श्रीदेवी विठ्ठल शेवगार व संगीता सिद्धलिंग कामोणे या माय-लेकींचा खून करण्यात आला, तर श्रुती व सारिका शेवगार यांच्यावर खुनी  हल्ला  करण्यात आला होता. याबाबत श्रुती शेवगार हिने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 

संगीता हिचा सिद्धलिंग याच्याशी मे 2015 मध्ये विवाह झाला होता. लग्‍नानंतर काही दिवसांनंतर सिद्धलिंग यास कायम शिक्षकाची नोकरी मिळण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याच्या घरातील लोकांनी संगीताचा छळ करून तिने तिच्या माहेराहून 20 लाख रुपये आणावेत म्हणून मागणी केली. त्यामुळे संगीताचा छळ होऊ लागला होता. या छळास कंटाळून संगीता ही तिची आई श्रीदेवी शेवगार हिच्या घरी गेली होती. त्यावेळी 28 जुलै 2015 रोजी

 रात्री सिध्दलिंग हा शेवगार यांच्या घरी गेला व त्याने संगीताला घटस्फोट पेपरवर सही का करत नाही म्हणून वाद घातला. यावेळी संगीता हिस लाकडी मुसळाने मारहाण करीत असताना संगीताची आई श्रीदेवी या सोडविण्यास आल्या. त्यावेळी त्यांनाही सिध्दलिंग याने मुसळाने मारुन दोघींच्या डोक्यात मोठा दगड घालून खून केला. 

यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या श्रृती व सारिका शेवगार यांनादेखील लाकडी मुसळाने मारुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी आरोपींना अटक करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. 

याची सुनावणी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश  सावंत-वाघोले यांच्यासमोर झाली. याप्रकरणी सरकारच्यावतीने 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सबळ  पुराव्याआधारे न्यायालयाने आरोपी  सिध्दलिंग व श्रीशैल बिराजदार यांना खून केल्याप्रकरणी तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि पंडित कामोणे, मंगल कामोणे यांना छळ केल्याप्रकरणी दोषी धरले. याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी, तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. व्ही.डी. फताटे, अ‍ॅड. मिलिंद थोबडे काम पाहात आहेत.