Thu, Jul 18, 2019 00:14होमपेज › Solapur › सोलापूर : माढ्यात शिंदे बंधूंविरोधात सहकार मंत्र्यांचा शड्डू

सोलापूर : माढ्यात शिंदे बंधूंविरोधात सहकार मंत्र्यांचा शड्डू

Published On: Feb 23 2018 10:17PM | Last Updated: Feb 23 2018 10:17PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुक्यात एकाच घरात दोन गट असून 'जित भी आपली व पट पण आपलीच' अशी अवस्था आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार आणण्यासाठी माढ्यातील भाजपचा उमेदवार निवडून आणला पाहिजे. तसेच भाजपचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन घ्या, अशी साद सहकारमंत्री ना.सुभाष देशमुख यांनी माढा तालुक्यातील बुथ प्रमुखांना घातली आहे. 

२०१९ ला जे बेघर आहेत त्यांना महाराष्ट्रात घर देणार असून २०२४ पर्यंत सर्वाना हक्काचे घर देणार असल्याची घोषणा राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी करून शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केले.

टेंभुर्णीत शुक्रवारी दुपारी "माढा विधानसभा मतदारसंघ भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे" आयोजन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

पुढे बोलताना ना.सुभाष देशमुख म्हणाले की, आपण उशिरा का होईना भाजपात आला, याबद्दल सर्वांचे स्वागत आहे. १० लोकांनी सुरू केलेल्या भाजपात ११ कोटी सदस्य आहेत. १३ राज्यात भाजपची सत्ता असून ५-६ राज्यात भाजपा युतीची सत्ता आहे. आता भाजपचा मोठा वटवृक्ष आहे.

पूर्वी इंग्रजांची जेवढी दहशत नव्हती, एवढी दहशत काँग्रेसने केली आहे. भाजपात लढणारे कार्यकर्ते होते म्हणूनच आज आपण हे दिवस पाहत आहोत. भाजपचा उद्देश केवळ सत्ता भोगणे हा नसून गोरगरिबांना सत्तेचा लाभ मिळवून देणे हा उद्देश आहे. व्यक्ती केंद्रित काम न करता पक्ष केंद्रित काम करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र माढा तालुक्यात व्यक्ती निष्ठेवर काम सुरू असल्याची टीका ना.देशमुख यांनी केली. आमचा पक्ष केंद्रबिंदू असला पाहिजे ही आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

पूर्वी जिल्ह्यात सात-आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या. या काळात गरिबांना काय मिळाले हो, असा उपस्थितांना सवाल त्यांनी केला. बँक साथ देत नसेल, सोसायटी सदस्य करून घेत नसेल, तर तक्रार करा असा सल्ला ही देशमुख यांनी दिला. जलयुक्त शिवारची कामे झाली पाहिजेत, सरकार आणण्यासाठी माढ्यातील भाजपचा उमेदवार निवडून आणला पाहिजे. तसेच भाजपचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन घ्या, असे आश्वासन ही शेवटी ना. सुभाष देशमुख यांनी दिले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी बोलताना सांगितले की, ना.सुभाष देशमुख यांना शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरुद्ध निवडणूक लढविल्याने मोठी किंमत मोजावी लागली. मोठे नुकसान सहन करावे लागले. जाणत्या राजाच्या विरोधात ना.देशमुख यांनी २.५ लाख मते मिळविली होती. माढ्यात आपण सर्वजण एक झाला तर आपले काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बरोबर येतात त्यांना विश्वास द्या. कसलीही ताकद लागू द्या, ती द्यायला आम्ही तयार आहोत असेही सांगितले.

जिल्हा संघटक राजकुमार पाटील बोलताना म्हणाले की, जे आपल्याबरोबर येथील त्यांना बरोबर घेऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. तुम्ही आजपासून कामाला लागला तर माढा मतदार संघात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. यावेळी जलतज्ञ अनिल पाटील, बबन केचे यांचीही भाषणे झाली.

प्रास्ताविकात भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी माढा तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी सांगून माढा विधानसभा मतदार संघातील भाजपची भूमिका स्पष्ट केली. तसेच सत्ताधारी आम्ही किती भाजपाबरोबर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. शिंदे घराण्याने आत्तापर्यंत सर्वाना फसविण्याचे काम केले आहे असा आरोप केला. तसेच या मतदार संघात भाजपचा उमेदवारास आमदार करावयाचे आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधावी असे सांगितले. यामुळे सक्षम पर्याय देणाऱ्या भाजपच्या पाठीशी सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे असे अवाहन शेवटी कोकाटे यांनी केले.