Thu, Aug 22, 2019 10:38होमपेज › Solapur › दीपप्रज्वलनाने सिद्धेश्‍वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

दीपप्रज्वलनाने सिद्धेश्‍वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 9:06PM

बुकमार्क करा
सोलापूर : इरफान शेख

सिध्देश्‍वर महायात्रेस सोमवारी सकाळी दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. दीपप्रज्वलनाचे मानकरी सुहास दर्गोपाटील व महानंदा दर्गोपाटील या दाम्पत्याच्या हस्ते पाच दिवे लावून राजशेखर हिरेहब्बू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यात्रेची सुरुवात झाली.

नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिध्देश्‍वर महाराजांची महायात्रा राज्यभर प्रसिध्द आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांतील भाविक सिध्देश्‍वर महायात्रेत सहभागी होतात. अष्टविनायकाची पूजा करुन कार्यक्रमास सुरुवात होते. रविवारी सकाळी अष्टविनायकाची पूजा करण्यात आली. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मल्लिकार्जुन मंदिरासमोरील दर्गोपाटील यांच्या वाड्यात श्री शिवयोगी सिध्देश्‍वर महाराज यांच्या नावाने पाच दिवे लावण्यात आले.

प्रमुख पुजारी राजशेखर हिरेहब्बू व त्यांच्यासोबत इतर मानकरी शिवशंकर हब्बू, सुरेश हब्बू, सिध्दलिंग हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये विधीवत पूजा अर्चना करत  सुहास दर्गोपाटील व महानंदा दर्गोपाटील या दाम्पत्याच्यावतीने सिध्देश्‍वर महाराजांच्या नावे दिवे लावण्यात आले. यावेळी श्रृती दर्गोपाटील, श्रेया दर्गोपाटील, श्रावणी दर्गोपाटील, रुपा कुताटे, मेघराज कुताटे, निरज मानवी, प्रभूराज मानवी, नीलाबाई जवळकोटे, आदी उपस्थित होते. दर्गोपाटील यांच्या वाड्यात सुमारे पंधरा पिढ्यांपासून दरवर्षी  हा दिवे लावण्याच्या कार्यक्रमापासून  श्री सिध्देश्‍वर महाराज  महायात्रेच्या धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होते. यात्रेच्या काळात सोलापुरातील 68 लिंगाना तैलाभिषेक केला जातो. मकर संक्रांतीला लाखोंच्या उपस्थितीमध्ये अक्षता सोहळा होतो.

हुग्गी, शांडगी महाप्रसादाचे वाटप
महायात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ करताना दीपप्रज्वलन महत्त्वाचे असते. त्याप्रमाणेच दर्गोपाटील यांच्या वाड्यात श्री सिध्देश्‍वर महाराजांच्या नावे पाच दिवे लावले व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादामध्ये हुग्गी, उडीद  पापड, शांडगी  हे होते. गव्हापासून हुग्गी तयार केली, तर    ज्वारी, तूर डाळ, हरभरा पीठ यापासून शांडगी पदार्थ तयार केले जातात.

पूजा विधी कार्यक्रम 
धार्मिक विधीस  प्रारंभ करताना मानकर्‍यांच्या घरी  दिवे  लावण्यात  आले. सकाळी मल्लिकार्जुन मंदिरात व सिध्देश्‍वर मंदिरात दर्शन घेऊन आरती करण्यात आली. राजशेखर हिरेहब्बू यांची पाद पूजा करण्यात आली. त्यानंतर  आरती करुन  महाप्रसाद  वाटप करण्यात आला.नंदीध्वज धारक  दिवसभर  महाप्रसादासाठी दर्गोपाटील   यांच्या वाड्यात दाखल   झाले होते.