Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Solapur › सिद्धेश्‍वर यात्रा; नंदीध्वज मार्गाची  पदाधिकारी, अधिकार्‍यांकडून पाहणी

सिद्धेश्‍वर यात्रा; नंदीध्वज मार्गाची  पदाधिकारी, अधिकार्‍यांकडून पाहणी

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:55PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिद्धेश्‍वर यात्रेसंदर्भातील पूर्वतयारीसाठी स्थानिक प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी महापालिकेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांनी पोलिस खात्याच्या अधिकार्‍यांसमवेत नंदीध्वज मिरवणूक मार्गाची पाहणी केली. 

बाळी वेसनजीकच्या हिरेहब्बू वाड्यापासून या पाहणीला सुरुवात झाली. महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्‍त डॉॅ. अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, सहायक पोलिस आयुक्‍त अपर्णा गीते, दीपाली काळे, सदर बझार पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरसिंह अंकुशकर, बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे, आरोग्य समितीचे सभापती संतोष भोसले, नगरसेवक नागेश वल्याळ, मेनका राठोड, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंंगाधर दुलंगे, उपअभियंता संदीप कारंजे, विभागीय अधिकारी मोहन कांबळे, यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू आदी या पाहणीत सहभागी झाले होते.

मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची स्वच्छता करण्याबरोबरच मिरवणुकीला अडथळा ठरणार्‍या केबल-विजेचे वायर, फांद्या हटविण्याच्या सूचना यावेळी महापौरांनी प्रशासनाला केल्या. याच मार्गावर दिवाबत्ती, पाण्याची सोय करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सध्या नूतनीकरण कामानिमित्त बंद असलेला रंगभवन-डफरीन चौकपर्यंतचा रस्ता 5 जानेवारीपासून खुला करण्यात येणार असल्याचे यावेळी कंपनीचे तपन डंके यांनी सांगितले. यात्रा होईपर्यंत या रस्त्याचे काम बंद ठेवण्यात येणार आहे. 

यावेळी मनपाचे मुख्य आरोग्य निरीक्षक संजय जोगदनकर, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, शिवानंद हिरेहब्बू, प्रदीप हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू , विकास हिरेहब्बू आदी उपस्थित होते.