Fri, Apr 26, 2019 10:15होमपेज › Solapur › सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसचा खोळंबाच

सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसचा खोळंबाच

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:38PMसोलापूर : प्रतिनिधी

सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसला सोलापूर स्थानकात पोहोचण्यास तब्बल 11 तासांचा विलंब झाला. यामुळे अनेक प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्‍त करत होते. 1 एप्रिलपासून वाकाव-वडशिंगे-माढा या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू झाल्याने इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 15 एप्रिलपर्यंत राहणार 
असल्याची माहिती याअगोदर रेल्वे प्रशासनाने दिली होती.

वाकाव ते वडशिंगे दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने उद्यानसह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. उद्यान व सिद्धेश्‍वर एक्स्प्रेस यांचे रेक इंटिग्रेशन असल्याने शनिवारी पुन्हा एकदा सोलापूरच्या प्रवाशांना फटका बसला. उद्यान एक्स्प्रेसचा मार्ग बदलल्याने उद्यानला शुक्रवारी मुंबईत पोहोचण्यास उशीर झाला. परिणामी शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुंबईहून सोलापूरला निघणारी सिद्धेश्‍वर एक्स्प्रेस शनिवारी पहाटेच्या सुमारास निघाली व सोलापूर स्थानकात शनिवारी सायंकाळी पोहोचली. दुहेरीकरणामुळे 6 एप्रिल ते 10 एप्रिलदरम्यान उद्यानसह नागरकोईल, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. या गाड्या सोलापूर स्थानकावरून न धावता गुंटकल-मिरज-पुणे मार्गे धावत आहे. परिणामी या गाड्यांना पोहोचण्यासाठी आपल्या वेळापत्रकापेक्षा सहा ते सात तास उशीर होत आहे. उद्यान एक्स्प्रेस गुंटकल-मिरज मार्गे धावत असल्याने शुक्रवारी मुंबईला पोहोचण्यास उशीर झाला. परिणामी सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसला मुंबईहून निघण्यास उशीर झाला.

शनिवारी कर्नाटक व कोईम्बतूर-कुर्ला एक्स्प्रेसला आपल्या निर्धारित वेळेपक्षा तास ते दीड तास उशीर झाला. या दोन्ही गाड्या सोलापूर विभागात उशिरा आल्या. सिद्धेश्‍वर एक्स्प्रेसने शनिवारी सकाळी पोहोचण्याऐवजी सायंकाळी पोहचल्याने एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाविरोधात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्‍त करत सांगितले की, सिद्धेश्‍वर बेभरवशाची एक्स्प्रेस झाली 
आहे.