Wed, Jan 16, 2019 10:14होमपेज › Solapur › योगदंड पूजनाने सिद्धेश्‍वर यात्रेला सुरुवात

योगदंड पूजनाने सिद्धेश्‍वर यात्रेला सुरुवात

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 11 2019 11:19PM
उत्तर सोलापूर ः प्रतिनिधी

नऊशे वर्षांपासून चालत आलेली ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेची  शुक्रवारी योगदंड पूजनाने सुरुवात झाली. सिद्धेश्‍वरांच्या यात्रेतील धार्मिक विधीला मोठे महत्त्व आहे. यात्रेतील धार्मिक रुढीपरंपरेने शुक्रवारी दुपारी सिद्धेश्‍वरांच्या हातातील योगदंड (काठी) उत्तर कसबा येथील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यातून शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या वाड्यात घेऊन विधिवत पूजा केली. शेटे यांचे वारस मिलिंद थोबडे यांचे पुत्र रितेश थोबडे यांनी योगदंडाची पूजा करून मानकरी हिरेहब्बू यांचे पाद्यपूजन केले. नंतर मानकरी हिरेहब्बू यांना महाप्रसाद देण्यात आला.

सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधी व यात्रेला खर्‍याअर्थाने आजपासून सुरुवात झाली. 13 जानेवारी रोजी तैलाभिषेक, तर सोमवारी अक्षता होणार आहे. या योगदंड पूजनावेळी मानकरी सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, तम्मा हिरेहब्बू, रेवण हिरेहब्बू, आकाश हिरेहब्बू, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, रितेश थोबडे, सुधीर थोबडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरसेवक किरण देशमुख, संदेश भोगडे आदीजण उपस्थित होते.