Thu, Jul 18, 2019 00:07होमपेज › Solapur › सिद्धरामेश्‍वरांचा तैलाभिषेक सोहळा; नंदीध्वजांची मिरवणूक

सिद्धरामेश्‍वरांचा तैलाभिषेक सोहळा; नंदीध्वजांची मिरवणूक

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:33PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

‘बोला... बोला... एकदा भक्‍तलिंग हर्रऽऽ  हर्रऽऽ बोला... हर्रऽऽ’, ‘सिद्धेश्‍वर महाराज की जय’ अशा अखंड जयघोषांनी सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरनगरी शुक्रवारी सकाळपासूनच दुमदुमली. ढोल-ताशा, सनई-चौघड्यांचा सुमधूर आवाज, हलग्यांच्या कडकडाटांत शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेला तैलाभिषेक करून प्रारंभ करण्यात आला. शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, आ. प्रणिती शिंदे, स्मृती शिंदे, सिद्धेश्‍वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करण्यात आली. 

दिवसभर रंगला सोहळा

सिद्धरामेश्‍वरांनी शहरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना नंदीध्वज मिरवणुकीने शुक्रवारी दिवसभर तैलाभिषेक करण्यात आले. या मिरवणुकीत हजारो भक्‍तांनी व मानकर्‍यांनी घातलेल्या पांढर्‍याशुभ्र रंगाच्या बाराबंदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तैलाभिषेक विधीसाठी मंगळवारी रात्री नंदीध्वजांना हिरेहब्बू वाड्यात साज चढविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू व मनोज हिरेहब्बू यांच्या हस्ते पहिल्या व दुसर्‍या नंदीध्वजाची पूजा करण्यात आली.  हिरेहब्बू यांच्या वाड्यात नंदीध्वजांच्या पूजेचा विधी पूर्ण झाल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत सर्वात पुढे पंचाचार्यांचा ध्वज होता. पाच- पाच पीठांचा हा ध्वज प्रतीक मानण्यात येतो. त्यानंतर सनई-चौघडा, हलग्या, बग्गी, सिद्धरामेश्‍वरांची पालखी, त्यानंतर सिद्धरामेश्‍वरांचे सात नंदीध्वज होते. ही मिरवणूक बाळी वेस येथील हिरेहब्बू वाड्यापासून सुरू करून मसरे गल्‍ली, दाते गणपती, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, जिल्हाधिकारी गेट, सिध्देश्‍वर मंदिर येथील अमृतलिंगास तैलाभिषेक करून मंदिरात थोडा विसावा घेण्यात आला. त्यानंतर सर्व नंदीध्वज 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले.

पहिल्या अमृतलिंगाला तैलाभिषेक

नंदीध्वजांची मिरवणूक जिल्हाधिकारी गेटवर सरकारी आहेर घेऊन मंदिरात आल्यानंतर सिद्धरामेश्‍वरांनी  स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी पहिल्या अमृतलिंगास मानकरी हिरेहब्बू यांनी हळद, तेल लावून विडा ठेवून तैलाभिषेक केले. त्यानंतर मंदिरात सिद्धेश्‍वरांच्या समाधीजवळ विविध पूजा करण्यात आल्या. यावेळी सिद्धेश्‍वर भक्‍तांनी ‘सिद्धेश्‍वर महाराज की जय’ असा जयघोष केला.

शिवशेट्टींना तेल गोळा करण्याचा मान

श्री सिद्धरामेश्‍वरांनी शहरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज निघतात. या तैलाभिषेकासाठी लागणारे तेल गोळा करण्याचा मान योगीनाथ शिवशेट्टी यांच्याकडे आहे. पूर्वी हा मान गणप्पा कळके घराण्याकडे होता. त्यानंतर या कळके घराण्याचे जावई शंकर शिवशेट्टी यांना तेल गोळा करण्याचा मान मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत हा मान शिवशेट्टी घराण्याकडे आहे.  योगीनाथ शिवशेट्टी हे तिसर्‍या पिढीचे मानकरी आहेत.

परंपरेनुसार यंदाही सरकारी आहेर

हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या व दुसर्‍या नंदीध्वजांची पूजा झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जिल्हाधिकारी जुन्या गेटजवळ आल्यानंतर 11.30 वाजण्याच्या सुमारास राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजचे मानकरी राजशेखर हिरहब्बू यांना फेटा, टॉवेल, हार घालून सरकारी आहेर केला. त्यानंतर हिरेहब्बूंनी प्रसाद म्हणून त्यांना खोबरे व लिंबू प्रदान केले. यानंतर सर्व काठ्या मंदिराकडे मार्गस्थ झाल्या.

पालखीला कुंभारीचे सेवेकरी; सहा वर्षांपासून मान

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या नंदीध्वजांच्या मिरवणुकीत पालखी पकडण्यासाठी दक्षिण सोलापूरमधील कुंभारी येथील धम्मा बिळेळी, श्रीशैल बिराजदार, श्रीकांत शिंदीबंदे, औंदसिद्ध धम्मा, सागर पाटील, पीरप्पा बिराजदार, शिलसिद्ध, सोनू पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, विजय पाटील, केदार पाटील, सोमलिंग कळकिळे, गेणसिद्ध पुजारी, राजकुमार बिराजदार, संजय धम्मा हे उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासून सिद्धरामेश्‍वरांची पालखी पकडण्याचा मान या कुंभारीच्या भक्‍तांना मिळत आहे.

विशेष शाखेचे पोलिस बाराबंदीच्या वेशात

सुरक्षेच्या द‍ृष्टिकोनातून सोलापूर पोलिस सदैव तत्पर असल्याचे दिसून येते. शुक्रवारी सिद्धेश्‍वर यात्रेमधील नंदीध्वज मिरवणुकीत विशेष शाखेचे 8 पोलिस कर्मचारी बाराबंदीचे वेश परिधान करून  नंदीध्वज मिरवणुकीमध्ये लक्ष ठेवून होते. यामध्ये एक पोलिस उपनिरीक्षक व 7 पोलिस कर्मचारी होते. शनिवारी अक्षता सोहळ्यात 12 पोलिस कर्मचारी बाराबंदीमध्ये असणार आहेत. त्यात 1 पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय व इतर पोलिस कर्मचारी आहेत.

मिरवणूक मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

सिध्दरामेश्‍वरांच्या नंदीध्वजांची मिरवणूक शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने संपूर्ण मिरवणूक मार्गावर प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

असे आहे मानाच्या विड्याचे स्वरुप

नंदीध्वजांची मिरवणूक सरकारी आहेर घेऊन मंदिरात अमृतलिंगाजवळ आल्यानंतर तेथे अमृतलिंगास हिरेहब्बू व शेटे यांनी तैलाभिषेक करून पूजा केली. त्यानंतर मानकर्‍यांना विडा देण्यात आला. या विड्यात पान, सुपारी, ऊस, बोरं, गाजर, खारीक, खोबरे यांचा समावेश करण्यात येतो. या विड्याला यात्रेमध्ये मोठा मान आणि परंपरा आहे.