Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Solapur › सिद्धेश्‍वर मंदिरात दासोहची ७७ वर्षांची परंपरा कायम

सिद्धेश्‍वर मंदिरात दासोहची ७७ वर्षांची परंपरा कायम

Published On: Jan 16 2018 8:17AM | Last Updated: Jan 16 2018 8:17AM

बुकमार्क करा
सोलापूर : इरफान शेख 

‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ या युक्तीप्रमाणे श्री सिध्देश्‍वर देवस्थान पंच कमिटीने सुरू केलेल्या दासोह अन्नछत्रम् या प्रसाद भवनास 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील 77 वर्षांपासून दासोहमध्ये सुरू असलेल्या सिध्देश्‍वर भक्तांना प्रसाद देण्याची परंपरा आजही कायम असल्याने यंदाच्या अक्षता सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले आहे.  

सिध्देश्‍वर मंदिरात सन 1940 च्या कालावधीपासून भाविकांना प्रसाद देण्याच्या निमित्ताने दासोह अन्नछत्रम्ची निर्मिती करण्यात आली होती. प्रारंभी हे दासोह अवघ्या एका खोलीच्या छताखाली सुरू करण्यात आले होते. त्यावेळी शहरातील लोकांच्या घरोघरी जाऊन प्रसाद गोळा करण्यात येत होता. मात्र हळूहळू मंदिर समितीची आर्थिक सुधारणा झाल्यावर मंदिर समितीने या दासोहला मोठ्या प्रमाणात रूप दिले. यानुसार पुढील कालावधीत या दासोह अन्नछत्रम्चा विस्तार करण्यात आला. या विस्तारात मंदिराच्या आतील बाजूस आकर्षक शेड तयार करून स्वयंपाक करण्यास जागा उपलब्ध करून देण्यात आली. आज या दासोहमध्ये खिर (हुग्गी), ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, भात, सांबर, गरगट्टा यासह विविध प्रकारच्या भाज्या असा शुध्द शाहकारी प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात येत आहे. यात्रेच्या कालावधीत या दासोहमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश यासह परदेशातील भाविक या दासोहचा लाभ घेतात तसेच पंढरपूरवारी, तुळजापूर येथे दसर्‍याच्यावेळी परराज्यांतून येणारे भक्तही या दासोहमध्ये प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

सिध्देश्‍वर मंदिरात असलेल्या या दासोहला सोलापूर तसेच परगावच्या व परराज्यांतून येणारे भाविक मोठ्या प्रमाणात स्वखुशीने देणगी देतात.

भाविक करतात सेवा

सिध्देश्‍वर मंदिर समितीच्यावतीने दासोहमध्ये प्रसाद घेण्यासाठी येणार्‍या सर्व भाविकांना अन्न वाटपासाठी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. तरीही सिध्देश्‍वर भक्त सेवा म्हणून स्वखुशीने सर्व भक्तांना दासोहमध्ये अन्न वाटपाचे काम करतात. यातून त्यांना आनंद मिळतो व श्री शिवयोगी सिध्दरामेश्‍वरांची सेवा केल्याचाही आनंद मिळतो, असे भक्तांचे मत आहे.  दासोह हे मंदिराचे वैशिष्ठ्य बनले आहे.