होमपेज › Solapur › उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना ‘शिवशाही’चा आधार

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना ‘शिवशाही’चा आधार

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 9:30PMसोलापूर  प्रतिनिधी

उन्हाळी सुट्ट्या लागल्याने गावी जाण्यासाठी प्रवाशांची ओढ लागली आहे. पुणे, मुंबईसह आदी शहरांकडे जाणार्‍या बसेस व मेल एक्स्प्रेस गच्च भरून जात आहेत. परंतु, ऐन सिझनमध्ये पॅसेंजर व मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये होत असलेले बदल पाहून अनेक प्रवासी शिवशाहीकडे व खासगी ट्रॅव्हल्सकडे वळले आहेत. प्रवाशांना वातानुकूलीत शिवशाहीचा व खासगी बसेसचा आधार प्राप्‍त झाला आहे.
एप्रिल महिन्यात सर्व वर्गाच्या परीक्षा संपलेल्या असतात. त्या अनुषंगाने प्रवासी सेवा देणारे शासकीय खाते प्रवाशांसाठी खास उपाययोजना करत असतात. मात्र, सोलापूर मध्य रेल्वे विभागाने ऐन सुट्ट्यांमध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिल असा 15 दिवसांचा ब्लॉक घेतला होता. त्यामुळे सोलापूर-पुणे (इंद्रायणी), सोलापूर-मिरज, सोलापूर-कोल्हापूर या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर उद्यान, हैदराबाद, नागरकोईल आदी लांब पल्ल्याच्या गाड्या वळविण्यात आल्या होत्या.त्यामुळे पुणे-मुंबई शहराकडे जाणार्‍या प्रवाशांनी शिवशाहीने व खासगी बसने जाणे पसंद केले.

एस.टी. महामंडळाने पुण्यासाठी ज्यादा शिवशाहीच्या फेर्‍या वाढविल्या होत्या. तसेच इतर साध्या बसेसच्या फेर्‍या वाढविल्याने खंडित रेल्वे सेवेच्या काळात एस.टी. महामंडळाच्या शिवशाहीचा आधार महत्त्वाचा ठरला.

सिद्धेश्‍वर एक्स्प्रेस व हुतात्मा एक्स्प्रेस कधीच वेळेवर सोलापूर स्थानकाला पोहोचत नसल्याने प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत एस.टी. किंवा शिवशाहीला अधिक पसंती देत आहेत. मोठ्या थाटात सुरु झालेल्या शिवशाहीला सोलापूरकर भरभरुन प्रतिसाद देत आहेत. सध्या एस.टी. महामंडळाला तोटा होत असला तरी शिवशाही वातानुकुलित बससेवेमुळे महामंडळात आर्थिक सुधार होत आहेत.

रेल्वे प्रशासनाने मात्र एकही मेल एक्स्प्रेस नवीन सुरु न केल्याने सध्याच्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांवर प्रवाशांचा बोझा निर्माण झाला आहे.दोन दोन महिन्यांअगोदरचे आरक्षण फुल्ल झाले आहे आणि जनरल डब्याने प्रवास करणे नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे प्रवाशी खासगी बस किंवा एस.टी. महामंडळाची शिवशाही बसचा आधार घेत आपला प्रवास सुखकर करत आहेत.एस.टी. खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर विभागातून 26 शिवशाही धावत आहेत. केवळ सोलापूर आगारातून 20 शिवशाही बसेस धावत आहेत. सोलापूर-पुणे मार्गावर 15 गाड्या, तर सोलापूर- हैदराबाद या मार्गावर 5 गाड्या धावत आहेत.