Sun, Apr 21, 2019 02:24होमपेज › Solapur › एमआयएमच्या मदतीने सेनेने घेतले ‘परिवहन’चे स्टेअरिंग

एमआयएमच्या मदतीने सेनेने घेतले ‘परिवहन’चे स्टेअरिंग

Published On: Mar 16 2018 11:07PM | Last Updated: Mar 16 2018 11:07PMसोलापूर : प्रतिनिधी 

महापालिका परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी समसमान मते पडल्याने काढलेल्या चिठ्ठीत शिवसेनेला लॉटरी लागली. सेनेचे तुकाराम मस्के हे विजयी झाले, तर भाजपचे गणेश जाधव पराभूत झाले. या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे जाहीर केलेल्या एमआयएमचा शिवसेनेला उघड पाठिंबा मिळाला. हार पत्करावी लागल्याने भाजपला मोठा धक्‍का बसला आहे.

सभापतिपदासाठी भाजपतर्फे गणेश जाधव, शिवसेनेकडून तुकाराम मस्के, तर एमआयएमच्या वतीने शाकीर सगरी यांनी बुधवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे पीठासीन अधिकारी होते. सुरुवातीला अर्जांची छाननी करण्यात आली. तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी मुदत देण्यात आली. यावेळी एमआयएमच्या सगरी यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर मतदान घेण्यात आले. समितीममध्ये भाजपचे 6, तर शिवसेनेचे 3, काँग्रेसचे 2, तर एमआयएमचा 1 असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधार्‍यांची तसेच विरोधकांची मते समसमान होती. या निवडणुकीसंदर्भात आधी काँग्रेसने एमआयएमला मदत करण्याचे जाहीर केले होते. मात्र गुरूवारी विरोधी पक्षांच्या बैठकीत एमआयएमचे गटनेते उपस्थित न राहिल्याने काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल करीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचे घोषित केले, तर एमआयएम या निवडणुकीतून माघार घेऊन तटस्थ राहणार असल्याचे या पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते. हे बदललेले गणित लक्षात घेता भाजपचे पारडे जड राहणार, अशी अटकळ होती. मात्र शुक्रवारी एमआयएमने तटस्थ राहण्याच्या भूमिकेत अचानक बदल करीत चक्क शिवसेनेला मतदान केले. यामुळे भाजपच्या उमेदवाराला व शिवसेनेच्या उमेदवाराला समसमान म्हणजे प्रत्येकी 6 मते मिळाली. यामुळे गजेंद्र घुटळ या अंध व्यक्तीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये मस्के यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने ते विजयी झाल्याचे पीठासीन अधिकारी राजेंद्र भोसले यांनी घोषित केले. या निकालामुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली, तर विरोधी पक्षांनी एकत्र येत जल्लोष केला.

सेना स्टाईलने काम करणार : मस्के
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना नूतन सभापती मस्के म्हणाले, महेश कोठे यांच्या किमयेने आपण ही निवडणूक जिंकली आहे. आपल्या विजयात काँग्रेस, एमआयएमचाही वाटा आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असलेल्या भाजपला सोलापूर शहर व परिवहनचा विकास साधता आला नसल्याने जनता नाराज आहे, हेच जणू या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असल्याने परिवहनला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणू तसेच शिवसेनेच्या स्टाईलने काम करु, असे ते म्हणाले.

विशेष समितीवेळी एमआयएमला मदत करणार : कोठे
एमआयएमने या निवडणुकीत मदत केल्याने शिवसेनेचा विजय झाला. याची एमआयएमला परतफेड विशेष समिती निवडणुकीवेळी करणार आहोत. विरोधी पक्षांनी एकत्र आल्यास काय होऊ शकते, याची ही चुणूक आहे. सत्ताधार्‍यांनी विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तो यशस्वी होऊ दिले नाही.  असेच प्रयोग यापुढेही होत राहणार पण विरोधी पक्षांनी एकी ठेवणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणाले.

दरम्यान, एमआयएमचे शाकीर सगरी यांना पत्रकारांनी सेनेला मदत करण्याचा निर्णय पक्षाचा की वैयक्तिक याविषयी छेडले असता त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला. यावर खोदून विचारले असता ही भूमिका वैयक्तिक स्वरुपाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.