Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Solapur › शिवसेनेमुळेच शेतकर्‍यांची कर्जमाफी : आ. निलम गोर्‍हे

शिवसेनेमुळेच शेतकर्‍यांची कर्जमाफी : आ. निलम गोर्‍हे

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:15PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसारखे प्रश्‍न शिवसेनेच्या रेट्यामुळेच मार्गी लागले आहेत़ भाजप सरकार हे करायला तयार नव्हते, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या व  प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांनी सोलापुरात केली. नारायण राणे यांचा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश हा आमच्यासाठी नगण्य विषय असल्याचे निलम गोर्‍हे यांनी सोलापूर दौर्‍यावर व्यक्‍त केले़

आ. डॉ. निलम गोर्‍हे या खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौर्‍यावर  होत्या़ बुधवारी दुपारी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिद्धेश्‍वर मंदिरात आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या़  यावेळी सिद्धेश्‍वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला़ यावेळी शिवसेनेचे    जिल्हाध्यक्ष   लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवसेनेच्या नेत्या अस्मिता गायकवाड, शाहू महाराज शिंदे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़  यावेळी आ. निलम गोर्‍हे म्हणाल्या की, शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, हिंदू भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. त्यांना सुरक्षित दर्शन घेता आले पाहिजे आणि कुठेतरी श्रद्धा आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये. हाच बाळासाहेबांचा कायम विचार राहिला आहे़  पाणी, स्वच्छतागृह आणि भाविकांचे प्रश्‍न यावर मागील  वर्षापासून मी काम करीत आहे व यापुढेही करीत राहणार असल्याचे निलम गोर्‍हे यांनी सांगितले़   आ. निलम गोर्‍हे यांनी भीमा-कोरेगाव या प्रश्‍नावर बोलणे टाळले़ 

आ. गोर्‍हे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी व्यंकटेश नंदाल, अनिल कोंडूर, संजय राठोड, अंकुश राठोड, जय पतंगे, अप्पू खरडे, राजू राठोड, लक्ष्मण जाधव, संदीप राठोड आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़