होमपेज › Solapur › काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला हैदराबाद महामार्ग

काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला हैदराबाद महामार्ग

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 10:22PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-हैदराबाद महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे व जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मुठीत आल्याने याविरोधात गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्यावतीने सकाळी दहा ते अकरा यावेळेत मुळेगाव तांडा परिसरात महामार्ग रोखून तासभर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

‘सोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर गुरुवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे युवानेते विजय राठोड, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष प्रा. राज साळुंखे, शिवसेनेचे नेते अनिलकुमार नन्‍नवरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करुन खड्ड्यात वृक्षारोपण करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे संचालक राजकुमार वाघमारे, जि.प. सदस्य राजकुमार गायकवाड, मनोज राठोड, जैनुद्दीन नदाफ यांच्यासह परिसरातील गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे; मात्र काम वेगाने होत नाही. कामानिमित्ताने अनेकठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. जागोजागी मोठे खड्डे पडले असल्याने सातत्याने याठिकाणी अपघात होत असल्याचे निवेदन यावेळी आंदोलकांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सकाळी अचानक  झालेल्या  आंदोलनामुळे वाहनधारकांची पंचायत झाली. सुमारे तासभर पूर्ण महामार्गच ठप्प झाल्याने मुळेगाव तांडा ते सोलापूर व पुढे दोड्डीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तालुका पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे काम रेंगाळत असून होणार्‍या अपघाताची जबाबदारी ठेकेदारावरच निश्‍चित करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी आंदोलकाच्यावतीने करण्यात येत होती. यावेळी बोरामणी, मुळेगाव, चिंतामणीनगर, दोड्डी, तांदूळवाडी, संगदरी, मुस्ती येथील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.