Mon, Jul 22, 2019 03:22होमपेज › Solapur › शिरढोण ओढ्यावरील पुलाचे आज भूमिपूजन

शिरढोण ओढ्यावरील पुलाचे आज भूमिपूजन

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 10:59PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेला  शिरढोण येथील दुर्गादेवी ओढ्यावरील पुलाच्या कामाचे आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते भूमिपूजन होत आहे. या पुलाच्या कामास सुरूवात होत असल्यामुळे शिरढोण, कौठाळी परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

शिरढोण, कौठाळी,  खेडभाळवणी  या गावांना जोडणारा भीमा नदीच्या बाजूने रस्ता आहे. या रस्त्यावर शिरढोण हद्दीत दुर्गादेवी मंदिराजवळ मोठा ओढा असून हा ओढा भीमा नदीजवळ असल्यामुळे नदीला पाणी वाढले की हा रस्ता पाण्याखाली जातो आणि या मार्गावरील रहदारी बंद पडते. त्यामुळे शिरढोण येथील नागरिकांना दोन कि.मी. ऐवजी 8 कि.मी. लांब जाऊन वाखरी मार्गे पंढरपूरला यावे लागते. शिवाय याच मार्गाने संत एकनाथ महाराज पालखी सोहळा येत असते. या सोहळ्याचीही ओढ्यावर पूल नसल्यामुळे गैरसोय होत असते. 

या सर्व समस्या लक्षात घेऊन शासनाने दुर्गादेवी ओढ्याजवळ नवीन पुल मंजूर केला आहे. सुमारे 2 कोटी 60 लाख रूपये अंदाजपत्रक असलेल्या या कामाचे भुमीपूजन रविवार ( दि. 31 डिसे.रोजी) राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते होत आहे. यावेळी आ. भारत भालके, विधानपरिषद सदस्य आ. दत्तात्रय सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिरढोणच्या सरपंच सौ. उज्वला दत्तात्रय कांबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू बागल, मायाक्का पशुखाद्य कारखान्याच्या अध्यक्षा विश्रांती भुसनर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या पुलाचे काम बरोबर 12 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून पुलाचे काम मार्गी लागल्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.