होमपेज › Solapur › राज्यात-देशात बदल निश्‍चित : शरद पवार

आंबे खायला सांगणार्‍यांपासून लांब राहा : पवार

Published On: Jun 12 2018 9:47PM | Last Updated: Jun 12 2018 9:47PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी

शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात पुत्रप्राप्तीसाठी आंबे खाण्याचा सल्ला दिला होता. या भिडेंच्या सल्ल्याचा खा. पवारांनी समाचार घेतला. ते म्हणाले, सध्या बाबा, बुवा-महाराजांनी उच्छाद मांडला आहे. त्यापैकीच एक म्हणजे भिडे. ते पोरं होण्यासाठी आंबे खा म्हणतात. अशा ढोंगी लोकांपासून जनतेने सावध राहिले पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले.

भाजपच्या फसवाफसवीच्या राजकारणामुळे सामान्य जनतेचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे आता सर्वांनी जागरूक राहण्याची वेळ आली आहे. तसे झाल्यास निश्‍चितच राज्याचे आणि देशाचे राजकारण बदलेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्‍त करत उद्योजकांना हजारो कोटींची मदत देणार्‍या सरकाराविरुध्द शेतकर्‍यांनी आता एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी आ. विनायकराव पाटील यांचा अमृतमहोत्सव, कै. के. एन. भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण व भिसे महाविद्यालयाच्या विविध इमारतींचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख होते. दुष्काळात पालकमंत्री असताना सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती आणि आता सुजलाम् सुफलाम् झालेला बदल निश्‍चित मन प्रफुल्लित करणारा असल्याचे सांगून खा. पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.  कै. के. एन. भिसे यांच्या कर्तृत्वामुळेच त्यांना जनतेने ‘मालक’ ही पदवी बहाल केली. सध्या भिसेंच्या विचारानुसार माजी आ. विनायकराव पाटील यांचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे पवारांनी सांगितले.

शेती उत्पादनाच्या आधारे भाव देण्याचे आश्‍वासन भाजपने निवडणुकीत दिले होते; मात्र हे आश्‍वासन त्यांनी पाळले नाही. शिवाय कर्जमाफीही पूर्णत: झालीच नाही. उलट केंद्र सरकारने उद्योजकांचा तोटा भरुन काढण्यासाठी त्यांना 85 हजार कोटींची मदत दिली. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. 

माजी आ. विनायकराव पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा  पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कै. के. एन. भिसे व माजी आ. पाटील यांच्या जीवनकार्यावरील ‘समर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

खा. पवार यांचा आ. बबनदादा शिंदे व माजी आ. पाटील यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला. कुर्डुवाडी नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते पवार यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात आ. गणपतराव देशमुख यांनी पवारांच्या सोलापूर जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. पवारांमुळेच देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख झाल्याचे सांगितले. शांत व संयमी असणार्‍या माजी आ. विनायकराव पाटलांची विकासकामांची कृती अफाट असल्याचे त्यांनी कौतुक केले. प्रास्ताविकात आ. बबनदादा शिंदे यांनी रेल्वे वर्कशॉप व चिंकहिल आरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा प्रश्‍न मांडला. विनायकराव पाटील व मी एकमेकांविरुध्द निवडणूक लढवली मात्र आमच्यात आजही मैत्रीचेच संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आ. विनायकराव पाटील म्हणाले, त्यावेळी माझी परिस्थिती नसतानाही पवारांनी मला निवडणुकीत उभे करुन माझ्यावर विश्‍वास दाखविला. सीना-माढा उपसासिंचन योजना, भीमा-सीना जोड कालवा, कोळेगाव धरण, टेंभुर्णी व कुर्डुवाडी एमआयडीसी अशा विविध योजनांना मंजुरी देऊन पवारांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. यावेळी आ. दिलीप सोपल, माजी आ. सुधाकर परिचारक यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमास माजी खा. पद्मसिंह पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. भारत भालके, आ. विक्रम काळे, आ. दत्तात्रय सावंत, माजी आ. राजन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. जयवंतराव जगताप, भाजपचे प्रांतिक सदस्य गोविंदराव कुलकर्णी, जि.प. सदस्य भारत शिंदे, रणजित शिंदे,  संजय पाटील-भीमानगरकर, डॉ. बी. वाय यादव, सभापती विक्रम शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, रिपाइंचे नेते बापूसाहेब जगताप, माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब भिसे, उपाध्यक्ष व्ही. जे. ठोकडे, माजी महापौर मनोहर सपाटे, जिल्हा मध्यवर्ती बॅॄकेच्या संचालिका रश्मी बागल, विलासराव घुमरे, माजी जि. प. अध्यक्ष मनोहर डोंगरे, कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, डॉ. मगन सुरवसे, संतोष कदम, संतोष भिसे, राजाभाऊ भिसे, बाळासाहेब पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत औदुंबर पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांनी आभार मानले. 

प्रभाकर देशमुखांच्या उपस्थितीची चर्चा
माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे यंदाचे उमेदवार कोण ? याबाबत तालुक्यात अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे विभागाचे माजी आयुक्‍त प्रभाकर देशमुख यांचे नाव पुढे येत आहे. खा. पवारांचे नातेवाईक असलेल्या देशमुखांनाच उमेदवारी मिळणार, असे ऐकायला मिळत होते. आज कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला देशमुखांनी आवर्जुन लावलेली उपस्थिती खूप काही सांगून गेली.