Sun, May 26, 2019 16:44होमपेज › Solapur › पवारांच्या खोड्यात ; भाजपा अडकली माढ्यात

पवारांच्या खोड्यात ; भाजपा अडकली माढ्यात

Published On: Feb 11 2019 11:06PM | Last Updated: Feb 12 2019 1:10AM
पंढरपूर : नवनाथ पोरे 

बारामतीची जागा जिंकून ४३ चा आकडा गाठण्याचे मनसुबे भारतीय जनता पक्ष पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर करीत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांच्या खोड्यात माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा अडकली आहे. आज परिस्थिती अशी आहे की, माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तीन प्रबळ उमेदवार तयार आहेत तर भाजपला उमेदवार शोधूनही सापडत नसल्याचे दिसते. 

माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मोदी लाटेतही हा बालेकिल्ला अबाधित राहिला आहे. आता मोदी लाट जवळपास ओसरली असताना या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून उमेदवारांचा शोध सुरू आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतील मोहिते विरोधकांचीच कुमक पळवून आव्हान उभा करण्याचे नियोजन भाजपकडून सुरू होते. मोहिते- पाटलांविरोधात राष्ट्रवादीचेच शिंदे, साळुंखे-पाटील, बागल, पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी परिचारक पक्षाला मदत करतील अशी भाजपला अपेक्षा होती. वेळप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आणि भाजपच्या टेकुवर जिल्‍हा परिषद अध्यक्षस्थानी बसलेले संजय शिंदे यांनाच मैदानात उतरवण्याचेही कारस्थान भाजपच्या नेत्यांनी रचले होते. या पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघात राष्ट्रवादी पुढे जोरदार आव्हान उभा करण्याचे भाजपचे नेते बोलून दाखवत होते.
दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच येथून परत एकदा निवडणूक लढवावी अशी शक्कल खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लढवली आणि पवारांकडे तशी मागणीही केली. यापुढे लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर करणाऱ्या पवारांनी सर्वांनाच कोड्यात टाकणारी भूमिका विचार करू अशी घोषणा केली. त्यामुळे माढा मतदारसंघातले राजकीय चित्रच पालटले असून पवारांविरोधात कोण लढणार अशी आता चर्चा सगळ्याच विरोधी गोटात सुरू आहे. कारण सोलापूर जिल्ह्यात थेट पवारांविरोधात लढण्यासाठी एकही भाजपेतर नेता तयार होणार नाही असे दिसते. भाजपकडे अगोदरच उमेदवार नाही, पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनाच गळ घालत असले तरी त्यांची मानसिकता दिल्ली पेक्षा आपली दक्षिण सोलापूरची गल्ली बरी अशी आहे. त्यामुळे देशमुख निवडणूक लढवतील असे आज तरी मानले जात नाही. ज्या संजय शिंदे यांच्यावर भाजपची भिस्त होती ते शिंदे पवारांच्या प्रचाराला लागतील असे भाजपचेच नेते बोलून दाखवत आहेत. त्यातूनच पंढरपूरात रविवारी सहकार मंत्री देशमुख यांनी संजय शिंदे यांच्यावर निशाणा साधत पवारांचा प्रचार करायचा असेल तर भाजपच्या पाठिंब्यावर मिळालेली पदे सोडा अशी मागणीच केली.

भाजपच्या वळचणीला गेलेल्या अनेक पवारवादी नेत्यांना देशमुख यांनी ही तंबी दिलेली आहे. यामध्ये विधानपरिषद सद्यस्य प्रशांत परिचारक यांचाही समावेश असून त्यांचेही सहकारमंत्री गटाशी जमत नाही. त्यामुळे सुभाषबापूंनी  परीचारकानाही इशारा दिल्याचे मानले जाते. तेवढ्याने हे नेते निमूटपणे भाजपच्या कंपूत सामील होतील असे नाही. उलट मूळ भाजपचे नेते, कार्यकर्ते या धक्कादायक घडामोडीमुळे हवालदिल झाल्याचे दिसत आहेत. अगोदरच सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात विस्तव आड जात नाही अशातच लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात सुभाष देशमुखांना ढकलून मजा बघत बसण्याचा पवित्रा भाजपच्याच पालकमंत्री समर्थकांनी घेतला आहे.  त्यामुळे पवारांच्या एकाच चालीत भाजपचे नेते गोंधळून गेले आहेत. सहकारमंत्री, पालकमंत्री गटातील वाद उफाळुन येण्याची शक्यता बळावली असून भाजपच्या वळचणीला गेलेले पवारवादी नेतेही पक्षापासून दुरावण्याचा धोका बळावला आहे. शिवाय राष्ट्रवादीला तगड्या विरोधाभावी माढा निवडणूक सोपी जाण्याचीच शक्यता बळावली आहे. एकंदर भाजपचे नेते बारामती जिंकण्याची भाषा करीत असतानाच माढा मतदारसंघातील रंगत आलेला खेळ बिघडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.