होमपेज › Solapur › सोलापूर : तडीपार शरद कोळीला २० पर्यंत अपिल करण्याचे आदेश

सोलापूर : तडीपार शरद कोळीला २० पर्यंत अपिल करण्याचे आदेश

Published On: Mar 06 2018 6:16PM | Last Updated: Mar 06 2018 6:15PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर, सांगली आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून तडीपार केलेला धाडस संघटनेचा प्रमुख शरद कोळी यास येत्या २० मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्‍तरिय खंडपीठाने हा आदेश दिले आहेत. तडीपारीचा आदेश रद्द करण्यासाठी कोळी यांनी न्यायालयात अपील केले होते. त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात विशेषत: मोहोळ, कामती, मंगळवेढा, सोलापूर शहर या पोलिस ठाण्यांमध्ये शरद कोळी याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि डीवायएसपी अभय डोंगरे यांनी तयार केलेल्या प्रस्तावावर आदेश देताना गेल्या महिन्यात त्यास तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्याचे आदेश पंढरपूरचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी काढले होते.

या आदेशाला कोळी याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करुन तडीपारीचा आदेश रद्द करावा, अशी मागणी अ‍ॅड. महादेव चौधरी, कांचन पवार यांच्यामार्फत केली होती. यावर आज मंगळवारी न्यायमूर्ती आर. एस. सावंत, एस. व्ही. कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने कोळी याची अपील निकालात काढत येत्या २० मार्चपर्यंत पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे रितसर अपील करण्याचे आदेश दिले. २० पर्यंत अपील न केल्यास २१ पासून तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. वाग्यज्ञी यांनी बाजू मांडली.  पोलिस प्रशासनातर्फे डीवायएसपी अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक त्रिपुटे उपस्थित होते.