Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Solapur › सहकार महर्षींच्या पुतळ्यास विरोध हा कृतघ्नपणा

सहकार महर्षींच्या पुतळ्यास विरोध हा कृतघ्नपणा

Published On: Jan 19 2018 7:55AM | Last Updated: Jan 19 2018 7:50AMअकलूज : वार्ताहर 

माळशिरस तालुक्याचे प्रश्‍न राज्याच्या विधानसभेत मांडून तालुक्याचे  नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणणार्‍या, सोलापूर जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवून जिल्ह्याच्या विकासाचे पर्व सुरू करणार्‍या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुतळ्यास होत असलेला विरोध राजकारण प्रेरित आणि व्यक्‍तीद्वेषाधारित असल्याचा आरोप करून हा विरोध म्हणजे सहकार महर्षींच्या कार्याशी केलेला कृतघ्नपणा असल्याचे मत  समर्थकांनी दै. ‘पुढारी’कडे व्यक्‍त केले.

माळशिरस येथील पंचायत समितीच्या सभागृहात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुतळा बसवण्याचा ठराव पंचायत समितीच्यावतीने करण्यात आला आहे.  मात्र, दरम्यान या ठिकाणी पुतळा उभारणीस स्थानिक विरोधकांनी विरोध दर्शवत निवेदन दिले. तसेच बुधवार  दि. 17 रोजी स्थानिक व्यापार्‍यांना पुढे करून माळशिरस बंदचे आवाहन करण्यास भाग पाडण्यात आले.शिवाय याच मुद्यावरून माळशिरस येथे रास्ता रोको आंदोलनाचेही नियोजन केल्याचे समजते.

वास्तविक या तालुक्याचे आमदार म्हणून ज्यांनी  20 वर्षे काम केले.  त्यांच्या विकास कामांसाठीच राज्य सरकारने जन्मशताब्दी वर्ष जाहीर केले. त्यांचा पुतळा उभारणीस एवढा विरोध होण्याचे कारण नाही. कारण त्यांनी आमदार म्हणून संपूर्ण तालुक्यासाठी काम केलेले असते. माळशिरस म्हणजे एकदम उजाड  माळरान होते. हे राजकारण सोडले तर कोणी नाकारणार नाही. अशा माळरानाचे नंदनवन करण्यासाठी सहकार महर्षींनी आणि नंतर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी  प्रयत्न केले. तालुक्याच्या दुष्काळी भागात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करण्याबरोबरच माळशिरस शहरात भव्य बस स्थानक, तहसील व पंचायत समितीचे भव्य कार्यालय, माळशिरस या तालुक्याच्या ठिकाणी व केवळ एकाच तालुक्यासाठी जिल्हा व वरिष्ठस्तर न्यायालय, त्यासाठी भव्य इमारती, पोलिस वसाहत, शहरात पाणी पुरवठा, रस्ता दुभाजक, अशी कामे करून घेतली आहे. मोहिते-पाटील कुटुंबीयांनी सगळी राजकीय प्रतिष्ठा वापरून माळशिरस तालुक्यात विकास कामे खेचून आणली. म्हणून माळशिरस तालुक्याचे नाव राज्य तसेच देशपातळीवर पोहोचले आहे. असे असताना त्यांचे हे काम नाकारणे म्हणजे कृतघ्नपणा असल्याची भावना तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून व्यक्‍त होत आहे. 

वास्तविक या बंद मागे राजकारण असल्याचेही बोलले जात आहे.  व्यापारी वर्गास पुढे करून विरोधकांनी कृतघ्नपणा केला आहे. ज्या विरोधकांचे तालुक्याच्या विकासात काडीचेही योगदान नाही ते विरोधक पडद्याआडून हा कृतघ्नपणाचा खेळ करीत असल्याचीही भावना दै. ‘पुढारी’कडे अनेक नागरिकांनी व्यक्‍त केली.