होमपेज › Solapur › लैंगिक छळ प्रकरणी वसतिगृह अधीक्षकाला अटक

लैंगिक छळ प्रकरणी वसतिगृह अधीक्षकाला अटक

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 1:06AMपंढरपूर : प्रतिनिधी

येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षकाने वसतिगृहातील काही विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले असून  याप्रकरणी  वसतिगृह अधीक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (वय 53 , रा. गुरुकृपा सोसायटी, चैतन्यनगर, पंढरपूर) याला पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे.  निर्भया पथकाने वसतिगृहास भेट दिल्यानंतर चौकशीदरम्यान मुलींनी या प्रकाराची वाच्यता केली. 

पंढरपूर येथे मुलींसाठी शासकीय वसतिगृह असून या ठिकाणी ग्रामीण भागातील शिक्षणासाठी आलेल्या मुली निवासी असतात. सोमवारी पोलिसांच्या निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक प्रीती जाधव, उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी पथकासह  वसतिगृहास भेट  दिली. यावेळी पथकातील पोलिसांनी विद्यार्थिनींना काही अडचणी आहेत का, अशी विचारणा केली असता विद्यार्थिनींनी वसतिगृहाचे अधीक्षक संतोष देशपांडे याच्याविषयी तक्रारींचा पाढा वाचला. देशपांडे हा काही विद्यार्थिनींना विविध कारणांनी आपल्या कार्यालयात एकटे बोलावून  घ्यायचा आणि त्यांच्यासोबत अश्‍लिल वर्तन करायचा अशी तक्रार यावेळी काही मुलींनी पोलिसांकडे केली. 

तसेच खोलीमध्ये एखादी मुलगी एकटी असली तरी गूपचूप त्या खोलीत जाऊन वाईट हेतूने मुलींना स्पर्श करायचा.  नुकतेच एका विद्यार्थीनीस ईमेल करायचा आहे  असे सांगून  आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि तिला लज्जा वाटेल असे वर्तन तिच्यासोबत केल्याचेही एका मुलीने पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारी एकेल्यानंतर एका पिडीत मुलीने शहर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार देशपांडे विरोधात भा.दं.वि. कलम 354, 354(ड), अ.जा.ज.का.क.3(1),3(2) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 8,10,12,42 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संतोष देशपांडे यास  मंगळवारी पहाटे  1 वाजता पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून  पुढील तपास पोलिस  उपअधीक्षक अनिकेत भारती करत आहेत.