Fri, Apr 26, 2019 18:14होमपेज › Solapur › कुंटणखान्याप्रकरणी महिलेसह तिघांना कोठडी

कुंटणखान्याप्रकरणी महिलेसह तिघांना कोठडी

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:39PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातील   जुळे   सोलापूर  भागातील श्रीनगरमधील घरगुती कुंटणखाना चालविल्याप्रकरणी महिलेसह तिघांना न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 
लक्ष्मी  यशवंत  सोनवणे  (पाटील) उर्फ प्रयागबाई धोंडीबा देवकते (वय 75, रा. देवडगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), आनंद महादेव  कवठे (वय 32, रा. मुस्ती, ता. दक्षिण  सोलापूर), घरमालक सुभाष धोंडीबा  देवकते (वय 50, रा. श्रीनगर, जुळे सोलापूर) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.

विजापूर   नाका  पोलिस  ठाण्याच्या पोलिसांना जुळे सोलापुरातील श्रीनगर येथील घरामध्ये कुंटणखाना सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी मंगळवारी एक बनावट गिर्‍हाईक पाठवून श्रीनगरातील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी एका पीडित महिलेला लक्ष्मी सोनवणे हिने पैशाचे आमिष दाखवून ती राहात असलेल्या घरात गिर्‍हाईक आनंद कवठे याच्यासाठी वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली. पोलिसांनी यावेळी लक्ष्मी सोनवणे, आनंद कवठे, घरमालक सुभाष देवकते या तिघांना अटक करुन याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक फुगे तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

अज्ञात कारणावरुन गणेश राजशेखर यनगंदुल (वय 35, रा. इंदिरा वसाहत, भवानी पेठ, सोलापूर) या तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पवार यांनी गणेश यनगंदुल यास खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. 

पैशाच्या कारणावरुन मारहाण

पैशाच्या कारणावरुन जुनी मिल चाळीमध्ये राहणार्‍या आरिफ शेखला मारहाण करणार्‍याविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ रफिक शेख (वय 23, रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन प्रशांत प्र्रभाकर पवार (रा. सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ शेख याचे नवी पेठेतील पारस इस्टेट येथे विक्रीचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रशांत पवार हा शेख याच्या दुकानात आला व त्याने 100 रुपयांचा गॉगल घेतला. त्यानंतर शेख याने पैसे मागितले असता पैसे देतो की असे म्हणून पवार याने शेख यास अर्वाच्च शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी इम्रान जब्बार सय्यद हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्यासही मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी लोक गर्दी करु लागल्यावर प्रशांत पवार हा पळून गेला. सहायक पो. नि. दिवसे तपास करीत आहेत.