सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्कमधील साईनगरामधील कुंटणखान्यावर शहर गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांनी छापा टाकला. यावेळी दोन तरुणींची सुटका करून एका महिलेसह तिघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
रशिदा समदअली लष्कर ऊर्फ अंजली शिवानंद येरटे (वय 30), तिचा भाऊ सादिक समदअली लष्कर (20, रा. तीतकुमार, पश्चिम बंगाल, सध्या रा. बॉम्बे पार्क), एजंट शिवानंद रामेश्वर येरटे (42, रा. देशमुख गल्ली, अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळ यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्कमधील साईनगरात एका बंगल्यामध्ये एक महिला व काही पुरुष कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी खात्री करून गुरुवारी रात्री बनावट ग्राहक पाठविला. ग्राहक कुंटणखान्यात गेल्यानंतर त्याची खात्री झाल्यानंतर त्याने मोबाईलवरून पोलिसांना मेसेज दिला. त्यानंतर लागलीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी साईनगरातील त्या बंगल्यावर छापा टाकला.
त्यावेळी त्या बंगल्यात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन मुली मिळून आल्या. तसेच बंगल्यामध्ये रशिदा लष्कर, सादिक लष्कर आणि एजंट शिवानंद येरटे हे मिळून आले. पोलिसांनी या तिघांना अटक करून दोन मुलींना ताब्यात घेतले.
रशिदा लष्कर व तिचा भाऊ सादीक हे दोघे महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सादिक हा कलकत्ता येथून महिलांना पैशाचे आमिष दाखवून सोलापूर येथे वेश्याव्यवसायासाठी आणतो व रशिदा ही तिच्या घरातील खोल्या महिलांना पुरवित असून ग्राहकाने दिलेल्या पैशातील निम्मे पैसे स्वतः ठेऊन घेते. तर शिवानंद येरटे हा वेश्याव्यवसायासाठी रशिदाकडे असलेल्या गाडीत आणून महिला पुरविण्याचे काम करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखालही पोलिस निरीक्षक प्रसन्नजित दुपारगुडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळ, महिला पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर, सुवर्णा काळे, पोलिस नाईक समीर होटगीकर, शबुराणी इनामदार, अर्चना गवळी, रणजित भोसले, ज्योती मोरे यांनी केली.