होमपेज › Solapur › सात जणांना कोठडी

सात जणांना कोठडी

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 9:05PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनात एस.टी. बसेसवर झालेल्या दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात पंढरपूर तालुका पोलिसांनी 5 तर शहर पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली असून सर्व सातही आरोपींना न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान,  कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पंढरपुरात मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.  पोलिस सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करीत येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून मूक आंदोलन केले.

गेल्या 15 ते 20 दिवसांत पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या हद्दीत मराठा आरक्षणाच्या दरम्यान विविध ठिकाणी दगडफेक करून एस.टी.ची तोडफोड करण्यात आली होती. यासंदर्भात पंढरपूर शहर पोलीसांनी शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड आणि संतोष कवडे यांना पोलिसांनी अटक होती तर शनिवारी सकाळी पंढरपूर तालुका पोलीसांनी प्रताप दयानंद भोसले, पांडूरंग प्रकाश  गायकवाड, किरण परमेश्‍वर भोसले,आकाश हणमंत भोसले, संतोष सुरेश भोसले या पाच संशयीतांना अटक केली आहे. सर्व सातही आरोपींना न्यायालयासमोर उभा केले असता न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्ट ( सोमवार ) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान कार्यकर्त्यांना अटक केल्याचे समजताच पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते, विविध संघटनांच्या पदाधिकरी उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांच्याकडे गेले असता कवडे यांनी  कोणतेही कारण देण्यास नकार दिला. 

मराठा समाजातील वकिल पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करीत आहेत. पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई सुरू केल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला आहे. सुमारे दिड तास छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडोळे यांनी आंदोलकांची समजूत काढून आंदोलन उठवण्यास भाग पाडले. दरम्यान या प्रकरणी चौकशीकरिता गेलेल्या वकीलांना तालुका पोलीस निरीक्षक जाधव यांनी अवमानस्पद वागणूक दिल्याने पंढरपूर बार असो.ने 16ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्व संशयीत आरोपींच्यावतीने 40 वकीलांनी मोफत खटला लढवण्याचीही घोषणा केली आहे.