Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Solapur › पसार दोन्ही नगरसेवकांना ७ दिवस पोलिस कोठडी

पसार दोन्ही नगरसेवकांना ७ दिवस पोलिस कोठडी

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 10:18PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

येथील सचिन कलुबरमे या युवकाच्या खून प्रकरणातील मंगळवेढा नगरपालिकेच्या फरार संशयित आरोपी 2 नगरसेवकांसह पंढरपूरच्या एका युवकास गुजरातमधील बलसाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 26 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फेसबुक कमेंट वरून  झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शहरातील मुरलीधर चौकात 25 एप्रिलच्या  सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सचिन ज्ञानेश्‍वर कलुबरमे याचा तीक्ष्ण कोयत्याने मानेवर वार करत खून केला  होता. तसेच यावेळी सचिन कलुबरमे याचा मित्र प्रदीप पडवळे हा गंभीर जखमी झाला होता. घटनेतील संशयित आरोपी नगरसेवक प्रशांत यादव आणि पांडुरंग नायकवाडी हे दोघेही पसार झाले होते. 

अनेक दिवसांपासून ते ठिकाणा बदलत असत. पुणे आणि कर्नाटकात त्यांच्या कसून शोध घेण्यात आला होता. परंतु बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती नुसार ते गुजरात मध्ये असल्याची खबर मिळताच विजय कुंभार यांच्या  पोलिस पथकाने शनिवारी त्याना बलसाड येथे ताब्यात घेतले. रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्याना मंगळवेढ्यात आणण्यात आले. त्यांच्या सोबत  पंढरपूर येथील शिवराज बाळासाहेब ननवरे (रा. क्रान्ती चौक पंढरपूर) या युवकासही  अटक केली असून शिवराज ननवरे हा पांडुरंग नायकवाडी याचा नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. रविवारी मध्यरात्री त्यांना मंगळवेढ्यात आणण्यात आले आहे. दोन्ही  फरार आरोपी नगरसेवकांना अटक व्हावी म्हणून मयत असलेल्या कलुबर्मे कुटुंबीयांनी महाराष्ट्र दिनादिवशी पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषण केले होते.
या घटनेला आता चार आठवडे उलटले असून जखमी असलेल्या प्रदीप पडवळे याने दिलेल्या फिर्यादी नुसार या गुन्ह्यात सहभागी असलेले प्रशांत यादव आणि पांडुरंग नायकवाडी हे दोन नगरसेवक कट रचन्यात सहभागी आहेत. रविवारी  त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 26 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.