होमपेज › Solapur › महापारेषण उभारणार होटगी, मोहोळ येथे 132 के.व्ही.ची उपकेंद्रे

महापारेषण उभारणार होटगी, मोहोळ येथे 132 के.व्ही.ची उपकेंद्रे

Published On: Jul 24 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 7:20PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून होटगी (ता. दक्षिण सोलापूर) व मोहोळ येथे उच्चदाब वीज जोडणीसाठी कर्षण उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. याबाबत प्रस्तावित योजनांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

या योजनेद्वारे या भागातील अति उच्चदाब ग्राहकांच्या वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी, नवीन ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी तसेच विद्युतपुरवठा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यानुसार होटगी येथे डीडीएफ योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या कर्षण उपकेंद्रासाठी 132 के.व्ही. क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी  2398.87 लाख एवढी अंदाजित रक्‍कम निश्‍चित करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या खर्चाने 132 के.व्ही.चे होटगी रेल्वे कर्षण उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ते होटगी रेल्वे कर्षण उपकेंद्रापर्यंत लिलो वाहिनी उभारण्यात येणार आहे. कुंभारी ते सोलापूर एमआयडीसी उपकेंद्रापर्यंत तसेच चेट्टीनाड सिमेंट कंपनी ते जुआरी सिमेंट कंपनीपर्यंत 132 के.व्ही.ची एकपथ वाहिनी उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रात 132 के.व्ही.चा फिडरही उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रात मिटरिंग सीटी (मेन व चेक) आयसोलेटर, मिटरिंग रुम, पीएलसीसी उपकरणे, बॅटरी व बॅटरी चार्जर, एबीटी मोजणी व इतर उपकरणे उभारण्यात येणार आहेत. येथे स्काडा प्रणालीही कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

मोहोळ एमआयडीसीचा समावेश

मोहोळ येथे डीडीएफ योजनेतून मध्य रेल्वेच्या कर्षण उपकेंद्राकरिता 132 के.व्ही. क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा अंदाजित खर्च 1038.45 लाख इतका आहे. ही कामे मध्य रेल्वेच्या खर्चाने करण्यात येणार आहेत. यातून 132 के.व्ही.चे मोहोळ कर्षण उपकेंद्र उभारणे, चिंचोलीकाटी ते मोहोळ उपकेंद्र वाहिनीच्या टॉवर क्र. 81 पासून मोहोळ कर्षण केंद्रापर्यंत द्विपथ लिलो वाहिनी उभारणे, 132 के.व्ही.चा फिडर उभारणे, मिटरिंग सीटी-पीटी (मेन व चेक), आयसोलेटर आदी उपकरणांची सेवा देण्यात येणार आहे.

पुरेशा व उच्च दाबाने वीजपुरवठा होणार

होटगी (ता. दक्षिण) सोलापूर येथे विविध सिमेंट कंपन्या आहेत. शिवाय इतर उद्योगांचेही काम सुरू आहे. या औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी महापारेषणने मागणीनुसार पुरेशा व उच्च दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. मोहोळ एमआयडीसीतही असे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी त्या त्याठिकाणी मध्य रेल्वेच्या आर्थिक मदतीतून ही कामे केली जाणार आहेत. यामुळे होटगी व मोहोळ येथील औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे.