Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Solapur › सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांची पंचाईत

सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांची पंचाईत

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 8:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने उत्पन्न, जातीचे दाखले, रहिवास दाखले, नॉन क्रिमिलेअर, नावात बदल आदी दाखले घेण्यासाठी शहर व तालुक्यातून आलेल्या शालेय विद्यार्थी व नागरिकांची  मोठी गर्दी सेतू कार्यालयात होत आहे. वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

नुकतेच इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना  विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू आहे. यातच तलाठी कार्यालयातील सर्व्हर बंद असल्याने दाखले मिळत नसल्याने ग्रामीण भागातून विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयातील सेतू विभागात यावे लागत आहे. येथे आल्यानंतर कोणता दाखला हवा आहे त्याचा फॉर्म भरावा लागत आहे. त्याचबरोबर त्याची फीदेखील भरावी लागते. त्यानंतर संगणकावर माहिती पाहून दाखला तयार करून सही करिता पुढे पाठवून दिला जातो. वरिष्ठांची सही लवकर होत नसल्याने विद्यार्थी व पालकांना ताटकळत बसावे लागत आहे. तर सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन सातबारा उतारे  मिळत नसल्याने शेतकर्‍यातून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

तहसील कार्यालय येथील सेतू विभागात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मात्र सेतू कार्यालयातील कामगार योग्य नियोजन करून कामकाज करत नसल्याने विद्यार्थी, पालक, नागरिक यांना ताटकळत बसावे लागत आहे. त्याचबरोबर ओळखीचा एखादा असेल तर त्याचे काम अगोदर कन दिले जात असल्याने नंबरला थांबलेले विद्यार्थी, पालक व कामगार यांच्यात वादावादी होत आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाचा कालावधी लक्षात घेऊन सेतू विभागातील कर्मचार्‍यांनी सुस्थितीत काम करावे व विद्यार्थी, पालक यांची होणारी तारांबळ दूर करावी अशी मागणी होत आहे.