Fri, May 24, 2019 20:33होमपेज › Solapur › भाजप-सेनेचे सरकार अपयशी

भाजप-सेनेचे सरकार अपयशी

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 11:04PM

बुकमार्क करा
तुळजापूर : प्रतिनिधी

भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे संपूर्णपणे अपयशी ठरले असून 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्‍वासने निखालस खोटी ठरली आहेत. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी या सर्व घटकांना भूलथापा देऊन सातत्याने फसवले गेले आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये या निष्प्रभ सरकारविरोधी प्रचंड चीड आणि संताप दिसून येत आहे. अशा फसव्या सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्‍त करत राष्ट्रवादी काँग्रेसने आई तुळजाभवानीमातेला साकडे घालून, तिचा आशीर्वाद घेऊन आणि तिच्या दरबारात पक्षाच्या वतीने जनक्षोभाचा जागर करत तुळजापुरातील पारंपरिक गोंधळ्यांनी गोंधळ घातला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुळजापूर येथे राजे शहाजी महाद्वारासमोर केले. 

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्यासह  अर्चना पाटील, सक्षणा सलगर, गोकुळ तात्या शिंदे, अशोक जगदाळे, विनोद गंगणे, पंडितराव जगदाळे, विजय कंदले, संदीप गंगणे, राहुल शिंदे, आनंद कंदले यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मंगळवार, 16 रोजी सकाळी 10 च्या सुमारास सर्व नेतेमंडळी तुळजापुरात दाखल झाली. सर्वप्रथम शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भवानी रोडमार्गे सर्व नेतेगण, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मंदिर महाद्वारासमोर दाखल झाले. मंदिरात जाऊन अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन निष्क्रिय सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलनास यश देण्यासाठी देवीला साकडे घातले.तुळजाभवानी दर्शनानंतर शहाजीराजे महाद्वारासमोर देवीचा पारंपरिक गोंधळ घालण्यात आला. 

तुळजापुरातील देवीचे पारंपरिक गोंधळी, उस्मानाबाद जिल्हा गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंधळी आणि त्यांचे 11 सहकारी यांनी पारंपरिक वेषभूषेत गोंधळ घातला. यात प्रकाश नन्नवरे, रोहित गायकवाड, तानाजी देडे, विजय मोरे, अनिल रसाळ, खंडू रसाळ, अनिल पांडे, चंद्रकांत मोरे, संजय मोरे, लक्ष्मण देडे यांचा सहभाग होता. त्यानंतर महाद्वारापासून तहसील कार्यालयावर मोर्चा नेत तहसीलदारांना निष्क्रिय सरकारविरोधात निवेदन देण्यात आले.

तुळजापुरातून आरंभ झालेल्या दुसर्‍या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनासाठी तुळजापूर शहर, ग्रामीण भागासह जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.