Fri, Nov 24, 2017 20:16होमपेज › Solapur › सोलापूर : सेल्फी विथ खड्डा; राष्ट्रवादीचे नेते बेपत्ता

सोलापूर : सेल्फी विथ खड्डा; राष्ट्रवादीचे नेते बेपत्ता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

 येत्या डिसेंबरपूर्वी राज्यातील महत्त्वाच्या महामार्गावरील खड्डे बुजून खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली होती. तर राज्यातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे, हे दाखविण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाला सोलापूर जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून काही पदाधिकारी सोडले तर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी या उपक्रमापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

राज्यातील महत्त्वाच्या महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतो. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले असून हे खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी येत्या डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी विभागाला सूचनाही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासन खड्डे बुजविण्याच्या मागे लागले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक भागातील खड्डे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मात्र या उपक्रमाला सोलापूर जिल्ह्यात म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने सोडले, तर कोणीच याकडे फारसे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच इतर पदाधिकार्‍यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत का? असा सवाल आता नव्याने उपस्थित केला जात आहे.