Thu, May 28, 2020 09:45होमपेज › Solapur › जि.प.च्या उत्पन्नात एक कोटीची भर होणार : डॉ. भारुड 

भंगार वाहनांच्या लिलावातून जिल्हा परिषदेला 48 लाखांचा महसूल

Published On: Dec 02 2017 10:30PM | Last Updated: Dec 02 2017 10:12PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या यंत्रकार्यशाळेत गेल्या 20 वर्षांपासून पडून असलेल्या कालबाह्य भंगार वाहनांच्या व अन्य साहित्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला 48 लाख रुपयांची रक्‍कम मिळाली आहे. मुख्यालयातील व पंचायत समिती स्तरावर असणार्‍या अन्य भंगार लिलावातून आणखी 70 लाखांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. यातून जिल्हा परिषदेचे सुमारे एकूण 1 कोटी रुपयाचे उत्पन्‍न वाढणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 

दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या व 2 लाख 40 हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास झालेल्या 12 वाहनांचा ई-लिलाव जिल्हा परिषदेने नुकताच घेतला. या लिलावातून जिल्हा परिषदेला 48 लाखांची रक्‍कम मिळाली. यात दहा जीप, 1 अ‍ॅम्बेसिडर कार, 1 टेम्पो व हातपंप पाईप यांचा समावेश होता. 

जिल्हा परिषदेच्या भंगारात पडून असलेल्या भंगार साहित्याचे शासकीय मूल्याकंन 36 लाख इतके होते. लिलावात झालेल्या स्पर्धेतून 48 लाख रुपयांची रक्‍कम मिळाली. त्यामुळे शासकीय मूल्याकंनापेक्षा जास्त रक्‍कम जिल्हा परिषदेला प्राप्‍त झाली आहे. 

जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती स्तरावर आणखीन भंगार साहित्य पडून असून त्याचीही ई-लिलावाची प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. यातून जिल्हा परिषदेला सुमारे 70 लाखांची रक्‍कम मिळण्याची अपेक्षा डॉ. भारुड यांनी व्यक्‍त केली. 

जिल्हा यंत्रकार्यशाळेतील उपअभियंता गणेश ढेरे यांनी या प्रक्रियेबाबत पुढाकार घेत ही प्रक्रिया यशस्वी केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषदेने घेतला असल्याचीही माहिती यावेळी डॉ. भारुड यांनी दिली. 6 डिसेंबर रोजी जळगाव येथे झीरो पेन्डन्सी उपक्रमाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने या उपक्रमात अत्यंत चांगले काम केल्याने केलेल्या कामांचे प्रेझेंटेशन या कार्यशाळेत करण्याची संधी राज्य शासनाने दिली आहे. यासाठी डॉ. भारुड यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या कार्यशाळेत खानदेशातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना डॉ. भारुड मार्गदर्शन करणार आहेत.  विशेष समाजकल्याण विभागाकडे असणार्‍या तांडा सुधार योजनेचा आढावा डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा परिषदेत घेण्यात आला. यावेळी गत पाच वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या योजनेतून पात्र गावांना 3 कोटी 22 लाखांच्या निधीतून विकासकामे घेण्यास मंजुरी देण्यात आली. ज्या गावांना यापूर्वी 10 लाखांपेक्षा जास्त निधी देण्यात आला ती गावे वगळून लोकसंख्येच्या प्रमाणानुसार हा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती डॉ. भारुड यांनी यावेळी दिली.