Tue, Apr 23, 2019 10:07होमपेज › Solapur › माणुसकीच्या एकतेसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

माणुसकीच्या एकतेसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

Published On: Apr 17 2018 10:48PM | Last Updated: Apr 17 2018 10:48PMसोलापूर : प्रतिनिधी

दुष्कर्माविरोधात सोलापूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी माणुसकीसाठी एकतेचा मोर्चा काढला. गुन्हेगारांना धर्म नसतो. पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे, असे फलक घेऊन शालेय विद्यार्थिनी यामध्ये सहभाग घेत शांतीचा संदेश दिला.

मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणुसकीसाठी एकतेचा मोर्चा काढण्यात आला होता. सोलापूर शहरातील ऑर्कीड कॉलेज, चंडक पॉलिटेक्निक महाविद्यालय, सिंहगड महाविद्यालय, अश्‍विनी महाविद्यालयातील वैद्यकशास्त्र विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. डोणगाव येथील प्राथमिक शाळेतील ऐश्‍वर्या साबळे, दिक्षा वाघमारे, सौंदर्या धाकतोडे, लक्ष्मी जाधव, प्रतिक्षा गायकवाड, श्रेया वाघमारे या विद्यार्थिनींनी शांतीचा संदेश देणारे पांढरे फुगे आकाशात सोडून मोर्चास सुरुवात केली.

हा मोर्चा कोणत्याही जातीचा किंवा पक्षाचा नसून फक्त सर्वसामान्य नागरिकांचा असल्याची माहिती अ‍ॅड. स्वप्नाली चालुक्य व निखील करणूर यांनी दिली. भारतामध्ये ज्या बलात्काराच्या घटना घडत आहेत, त्या अतिशय लज्जास्पद घटना आहेत. हा मोर्चा फक्त असिफासाठी नव्हे, तर देशातील सर्व पीडित महिला, विद्यार्थिनी व अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात असल्याची माहिती देण्यात आली.

या मोर्चामध्ये शिवानी गोटे, विस्मय गायकवाड, तन्मोई देखणे, रुद्राणी उपाध्ये, खुशी उपाध्ये, अ‍ॅड. मंजुनाथ कक्कलमेली, मनोज देवकर, रश्मी माने आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

मुलींनी यापुढे कराटे व बॉक्सिंग शिकणे गरजेचे आहे

देशभरात होत असलेल्या मुलींवर अत्याचाराविरोधात बोलताना वसुंधरा शर्मा यांनी सांगितले की, यापुढे मुलींनी मेहंदी, शिवणक्लास हे सोडून ज्युडो कराटे व बॉक्सिंग, कुस्ती शिकणे गरजेचे झाले आहे. बळी पडणारी महिला कोणत्याही जातीची असो, तिच्यावर अत्याचार झालेला असतो व गुन्हेगार हा कोणत्याही जातीचा नसतो, असे या मार्चमध्ये संदेश देण्यात आला.