Tue, Jul 16, 2019 01:23होमपेज › Solapur › नर्सिंग कॉलेजची स्कॉलरशिप 3 वर्षांपासून थकीत

नर्सिंग कॉलेजची स्कॉलरशिप 3 वर्षांपासून थकीत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

जिल्ह्यातील 19 नर्सिंग महाविद्यालयातील व्हीजेएनटी तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप गेल्या तीन वर्षांपासून थकली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाच्या विरोधात येत्या 30 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नर्सिंग महाविद्यालय चालक संघटनेचे जयंत नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिल असोसिएशनच्या वतीने मान्यता दिलेली 19 महाविद्यालये असून या माध्यमातून दरवर्षी 850 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून व्हीजेएनटी व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षक आणि संस्थाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

विद्यार्थ्यांकडून फी वसूल करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण चौकशी करुन विद्यार्थ्यांची तत्काळ स्कॉलरशीप जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही महाविद्यालयांना यापूर्वी स्कॉलरशीप देण्यात आली आहे, असे सांगण्यात येते. मात्र त्यांची चौकशी करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले असले तरी सहाय्यक समाजकल्याण विभागाच्या वतीने तशा प्रकारची चौकशी अद्याप केलेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

30 नोव्हेंबर रोजी चार हुतात्मा चौकातून संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी मिळून मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी हणमंत चोपडे, बिरोबा शेळके आदी उपस्थित होते.