Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Solapur › कृषी महोत्सव टेंडर प्रक्रियेमध्ये घोटाळा!

कृषी महोत्सव टेंडर प्रक्रियेमध्ये घोटाळा!

Published On: Mar 24 2018 1:55AM | Last Updated: Mar 23 2018 10:31PM
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा कृषी महोत्सवातील इव्हेंट मॅनेजमेंट व मंडप साहित्य व इतर सेवासुविधा यासाठी राबविण्यात आलेल्या ई-टेंडर प्रक्रियेत 12 लाखांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकार्‍यांनी ई-टेंडरची प्रक्रियाच मॅनेज करून 8 लाखांचे असलेले टेंडर तब्बल 20 लाखांना दिले आहे. शासनाला जवळपास 12 लाखांचा भुर्दंड सोसावा लागला असून जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

सोलापुरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने 11 ते 15 मार्चअखेर भव्य असा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली सनियंत्रण समितीचीही स्थापना करण्यात आली होती. महोत्सवासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या समितीकडे सोपविण्यात आली होती. याच अंतर्गत  या महोत्सवासाठी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून इव्हेंट मॅनेजमेंट व मंडप साहित्य व इतर सेवासुविधा यासाठी ई-टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. या  प्रक्रियेत 4  कंत्राटदारांनी सहभाग घेतला. यामध्ये सचिन प्रवीण मंडप, गणेश मंडप, सिद्धेश्‍वर मंडप आणि शुअरशॉट इव्हेंट यांनी सहभाग घेतला. यामध्ये ई-टेंडर नियमानुसार सर्वात कमी दरपत्रक ज्यांनी सादर केले आहे अशा कंत्राटदारास काम देणे अभिप्रेत आहे तसेच काही अपरिहार्य कारणास्तव कमी दरातील कंत्राटदार काम करण्यास तयार नसल्यास कमी दरातील 2 क्रमांकाच्या कंत्रादारास क्रमांक 1 च्या दरामध्ये काम करण्यास तयार आहे का? याची विचारणा करून क्रमांक 1 च्या दरामध्ये क्रमांक 2 ला काम द्यावे, असे वित्त व लेखा विभागाचे स्पष्ट निर्देश आहेत.  असे असताना निविदा प्रक्रियेत सचिन प्रवीण मंडप डेकोरेटर यांनी 7.99 लाखांचे कोटेशन सादर केले होते. मात्र कृषी विभागाच्या यंत्रणेने कमी दरातील कंत्राटदारांकडून हे काम मला परवडत नाही असे लिहून घेतले व गणेश मंडप डेकोरेटर यांना नियमाप्रमाणे 7.99 लाख या रकमेला काम देणे अपेक्षित असताना 7.99 लाखांचे काम 20.74 लाख रुपयांमध्ये दिले. यामुळे शासनाला जवळपास 12 लाखांहून अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करावी
कृषी महोत्सवाच्या इव्हेंट मॅनेजमेंट व मंडप साहित्य व इतर सेवासुविधा यासाठीच्या टेंडर प्रक्रियेतील घोटाळ्याची कृषी महोत्सव समितीचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गंभीर दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. अतिरिक्‍त 12 लाखांच्या निधीची वसुली संबंधित अधिकार्‍यांकडून करावी, अशी मागणी होत आहे. 
 

Tags : solapur, agricultural, festival, tender, scam