होमपेज › Solapur › नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांचा मनमानी कारभार

नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांचा मनमानी कारभार

Published On: Mar 24 2018 1:55AM | Last Updated: Mar 23 2018 9:22PMभाळवणी : वार्ताहर

नीरा उजवा कालवा भाळवणी शाखा नं. 2 ला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाने टेल टू हेड पाणी वाटप करण्यात यावे असा नुकताच आदेश देऊनही नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी हा आदेश धाब्यावर ठेवून शाखा क्र.2 वरील फाट्याला पाणी सोडून मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे अशा संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करून निलंबित करावी, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.

नीरा उजवा कालवाअंतर्गत असलेल्या भााळवणी शाखा क्र. 2 वरील शेतकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्‍न सातत्याने गाजत असून अनेकवेळा आंदोलने करण्याची वेळ आली. सातत्याने संघर्ष करूनही राजकीय अनास्थेमुळे याकडे लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्यामुळे येथील शेतकर्‍यांनी जलसंपत्ती प्राधिकारणाकडे याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाने टेल टू हेड  नियमानुसार पाणी सोडावे असा आदेश नुकताच दिला  आहे. परंतु या आदेशाची कुठलीही अमंलबजावणी न करता कार्यकारी अभियंता यांनी पूर्वीप्रमाणे मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. 

नीरा -उजवा कालव्यातून सोडण्यात येणार्‍या प्रत्येक पाणी आवर्तनावेळी कार्यकारी अभियंता यांचा प्रत्येक विभागातील पाणी वाटप नियोजनात विसंगती दिसून येत आहे. शासन निर्णयानुसार कुठल्याच आदेशाची अमंलबजावणी होताना दिसून येत नाही.  सुरू असलेल्या उन्हाळ्या हंगामात नुकतेच कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या दोन्ही विभागातील पत्रामध्ये विसंगती दिसून येत आहे. फलटण विभागामध्ये 39 फाटा टेल असूनसुद्धा तो मोठा आहे. लहान फाट्यावर अन्याय नको म्हणून तो फाटा टेल असूनसुध्दा वरील लहान फाट्याला पाणी सोडायचे अन् माळशिरस उपविभागात मात्र भाळवणी शाखा क्र. 2 टेल आहे परंतु, येथे मात्र शाखा नं. 1 मोठी असल्यामुळे त्या शाखेला अगोदर पाणी दयावे, असा विरोधाभास कार्यकारी अभियंता यांनी दोन्ही पत्रामध्ये केला आहे. त्याचबरोबर 2005 चा समान पाणी वाटपा कायद्यालाही केराची टोपली दाखविली जात असून सिंचन क्षेत्रानुसार पाणी वाटप केले जात नाही. 

उन्हाळी हंगामातील पाण्याचे आवर्तन 12 मार्च रोजी सुरू होऊनही अद्याप भाळवणी शाखा क्र.2 ला पाणी मिळालेले नाही. माळशिरस उपविभागात शाखा क्र.2 ही शेवटची शाखा असून याअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील भाळवणी, जैनवाडी, धोंडेवाडी, पिराचीकुरोली, केसरकवाडी, भंडीशेगांव, पळशी, गार्डी, शेंडगेवाडी व माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी, मळोली, महिम, फळवणी, कोळेगांव, तोंडले, दसूर, शेंडेंचिच अदि परिसरातील सिंचन क्षेत्र येते.  सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असून पाण्याची भूजल पातळी खालवल्यामुळे बोअर, विहिरी कोरड्या पडू लागले आहे. गेल्या अडीच महिन्यापासून नीरा उजवा कालव्याचे पाणी कॅनॉलला सुटले नाही. त्यामुळे शेतातील पिके जळू लागली आहेत. त्याचबरोबर पिण्याचा पाण्याचाप्रश्‍नही गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांंना वेठीस धरणार्‍या संबंधित कार्यकारी अभिभंता यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी  वर्गामधून होत आहे. 
 Tags  : solapur, nira right, canal, scam