Thu, Aug 22, 2019 08:19होमपेज › Solapur › सात-बारा उतारा 1 मेपासून डिजिटल 

सात-बारा उतारा 1 मेपासून डिजिटल 

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 10:50PMसोलापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील केवळ आठ गावांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यातील 1131 गावांतील शेतकर्‍यांचा सात-बारा उतारा आता डिजिटल स्वाक्षरीने मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यापुढे उतार्‍यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

शासनाने सर्वच गोष्टी आता ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचा उताराही ऑनलाईन करण्याचे धोरण राज्याच्या महसूल विभागाने ठेवले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 1139 गावांतील शेतकर्‍यांच्या शेतीचा सात-बारा उतारा डिजिटल करण्याचे प्रयत्न शासनाच्या महसूल विभागाने केले होते. 

मात्र काही तांत्रिक अडचणी आल्याने सोलापूर जिल्ह्यातील आठ गावांचे सात-बारा डिजिटल होऊ शकले नाहीत. मात्र उर्वरित 1131 गावांतील उतारे डिजिटल करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे या कामात सोलापूर जिल्हा अग्रेसर ठरला असून सोलापूर जिल्ह्यात या मोहिमेचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. काही गावे मोठी असल्याने तांत्रिक अडचणी आल्या अन्यथा सोलापूर जिल्हा या कामात शंभर टक्के यश प्राप्त करु शकला असता, असा विश्‍वास तेली यांनी व्यक्त केला आहे.  या कामात महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेल्या दहा तलाठी, प्रत्येक तालुक्यातून दोन मंडल अधिकारी, एक तहसीलदार आणि एका उपजिल्हाधिकार्‍यांचा महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.