Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Solapur › सावधान...पावसाळ्यात बसतोय शॉक

सावधान...पावसाळ्यात बसतोय शॉक

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 10:53PMसातारा : संजीव कदम

कोणतीही वीज ही जीवघेणीच. पावसात तयार होणारी नैसर्गिक वीज असो की महावितरण वा अन्य कंपन्यांद्वारे तयार केली गेलेली मानवनिर्मित वीज असो. मानवनिर्मित वीज सोयीसुविधांसाठी असलीतरी अनेकदा विद्युत वाहिनीतील उच्चदाब काळ बनून आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेषत: पावसाळ्याच्या तोंडावर शॉक लागून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. वीज मंडळाचा जीवघेणा कारभार व नागरिकांचा निष्काळजीपणा अशा घटनांना कारणीभूत ठरला आहे. 

पावसाळ्यात ढगांमध्ये तयार होणारी  वीज ही अनेकदा एक नैसर्गिक आपत्ती म्हणूनच विद्धवंस घडवते. मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर काळातच असंतुलित वातावरणाने आकाशात विजा चमकतात. हवेतील वाढलेले बाष्प, वरच्या बाजूस जाणारा हवेचा प्रचंड झोत आणि उष्णतेने होणारे अभिसरण यामुळे बनणार्‍या क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांतून विजांची निर्मिती होते. ही वीज अनेकदा यमदूत होवूनच कोसळते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या वळीव पावसात जशा जीवघेण्या घटना घडतात तशाच पावसाळा सुरू झाल्यावरही शॉक लागून मृत्यू पावल्याच्या घटना घडत असतात. वर्णे येथील एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने हे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले. यंदाच्या पावसाळ्याच्या तोंडावर अशाच काही दुर्घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. 

पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे व शॉक लागण्याचे प्रकार सतत घडतात. परंतु, वीज का गेली, का जाते, शॉक का व कसा लागतो? या प्रश्‍नांची उत्तरे कोणीही शोधत नाही. अनेकदा यंत्रणाच दोषी असते. मात्र, त्याचवेळी याबाबतीतील गुंतागुंत समजून घेऊन अपघात टाळणेही महत्वाचे असते. 

खांबात वीज उतरू नये यासाठी चिनीमातीचे इन्सुलेटर बसविले जातात. हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात. पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे  वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. यामुळे आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर फिडर बंद पडला नाहीतर जीवित अथवा वित्त हानी होते. जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. असे असले तरी सातारा जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर शॉक लागून काहीजणांना जीव गमवावा लागला आहे. अशा पैकी अनेक घटनांना विद्युत मंडळाचा भोंगळ कारभारच कारणीभूत ठरला आहे. वीज मंडळाच्या अब्रूचे धिंडवडे काढणार्‍या या घटनांनी नागरिकांनाही तितकाच सावधानतेचा इशारा दिला आहे. यंत्रणा सुधारेल तेव्हा सुधारेल. मात्र, नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.