Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Solapur › सापटणे येथे निवडणूक निकालावरून दोन गटांत राडा

सापटणे येथे निवडणूक निकालावरून दोन गटांत राडा

Published On: Mar 01 2018 12:53AM | Last Updated: Mar 01 2018 12:51AMटेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुक्यातील सापटणे (टें) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक निकालावरून गावातील दोन गटांत बाचाबाची झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण असून 6 गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या दगडफेकीत दोघे जखमी झाले. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापटणे (टें) येथे एका ग्रा.पं. सदस्याने राजीनामा दिल्याने त्या जागेची निवडणूक झाली होती. या जागेवर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढवळे यांच्या गटाचा रोहित उर्फ अक्षय जगन्नाथ ढवळे हा निवडून आले. यानंतर विजयी उमेदवारांसह कार्यकर्ते काही गाड्यांमधून जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना भेटण्यास जात असताना विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी सापटणे ते सापटणेपाटी या रस्त्यावर वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करीत सहा गाड्यांच्या काचा फोडल्या. यावेळी पोलिसही बरोबर होती.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून गावात तणाव निर्माण झाला.पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे.तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक आनंद खोबरे आदी पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पोलिस मुख्यालय, करमाळा येथून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आला होता. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.