Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Solapur › माळीनगर येथे  तुकाराम महाराज यांचे उभे रिंगण 

माळीनगर येथे  तुकाराम महाराज यांचे उभे रिंगण 

Published On: Jul 19 2018 12:23PM | Last Updated: Jul 19 2018 12:23PMमाळीनगर  : गोपाळ लावंड 

 टाळ, मृदुंगाचा ध्वनी | 

गेले आसमंत व्यापुनी | 

नभ आले भरूणी | 

अश्व दौडले रिंगणी || 

माळीनगर (ता. माळशिरस जि. सोलापूर) येथे संतश्रेष्ठ आज (दि. १९जुलै)जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या  पालखीचे उभे रिंगण मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. माळीनगर पालखी मैदानात अश्वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळ मृदुंगाचा नाद त्यातून निर्माण होणारे ज्ञानबा-तुकाराम नामाचा गजर या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय.

सावळे सुंदर रूप मनोहर

 राहो निरंतर ह्रदयी माझे 

टाळ मृदंगाचा नाद , कपाळी अष्टीगंध आणि मुखात हरीनामाचा जयघोष. गेली पंधरा दिवस अखंडितपणे विठुरायाच्या ओढीने निघालेला वारकरी हजारो वैष्णवांच्या साक्षीने माळीनगर नगरीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मानाच्या अश्वाच्या उभ्या रिंगणाने भल्या सकाळी मॉडेल हायस्कूलच्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या उत्साहाने विसावला. 

  याची देही याची डोळा 

पहावा सोहळा 

परिसराला जणू विठ्ठलनामाचे वेड लागले होते ज्ञानोबा माऊली तुकाराम गजराने आसमंत दुमदुमला. सकाळपासून पालखी स्वागतासाठी ग्रामपंचायत माळीनगर, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी  यांचेसह अनेक सामाजिक संघटना, महात्मा फुले पतसंस्था,  स्थानिक प्रतिनिधी सज्ज झाले होते.

उभ्या रिंगणासाठी जमलेला हजारोंचा जनसमुदाय डोळयाचे पारणे फेडत होता. अखेर मानाच्या अश्वाने रिंगणात धाव घेतल्यानंतर दोन्हीबाजूला उभा असणारा वारकरी भान हरपून गेला होता आणि याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत सोहळा डोळ्यात साठवत होता.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर सालाबाद प्रमाणे  विधीवत पूजन शुगरकेन सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश गिरमे व त्यांच्या सुविद्य पत्नी रेखा गिरमे यांच्या हस्ते  करण्यात आले.