Thu, Jun 20, 2019 21:23होमपेज › Solapur › माऊलीच्या रिंगण सोहळयात वैष्णव भक्तिरसात चिंब

माऊलींचा रिंगण सोहळा; वैष्णव भक्तीरसात चिंब

Published On: Jul 19 2018 11:53AM | Last Updated: Jul 19 2018 11:53AMपानीव(जि. सोलापूर) : विनोद बाबर 

याची देही याची डोळा

आज पाहिला रिंगण सोहळा

अश्व धावले रिंगणी

होता टाळ मृदुंगाचा ध्वनी

हरिनामाच्या जयघोषाने

गेले रिंगण रंगुनी!!

पंढरीच्या विठुरायाच्या ओढीने आळंदी येथून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दूसरे गोल रिंगण पानीवपाटी(खुडूस)  येथे भक्तिरसात पार पडले. लाखो वैष्णवांनी हा सोहळा आपल्या नयनात साठवून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. 

माळशिरस मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सकाळी  ९ वाजता आगमन झाल्यानंतर खुडूस ग्रामपंचायतीच्यावतीने पालखीला तोफांची सलामी देवून स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीला मुख्य रिंगण सोहळयाच्या ठिकाणी खांदा देवून आणण्यासाठी झुंबड उडाली. चोपदारने गोल रिंगण लावून घेतल्यानंतर सकाळपासून रिंगण सोहळा पाहण्यासाठी असूसलेल्या भविकांच्या नजरा आता माऊलीच्या अश्वाकडे लागल्या इतक्यात स्वराचा अश्व रिंगणात दाखल झाला आणि टाळ्यानी आसमंत दणाणून गेला. स्वराचा अश्व पुढे व त्यापाठोपाठ माऊलीचा अश्व काही क्षणात दोन्ही अश्वांनी दोन फेऱ्या पूर्ण करून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले यावेळी अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. रिंगण सोहळ्यानंतर फुगड्या, पावल्या, काटवट, हुतूतू, आदी पारंपरिक खेळ खेळण्यात महिला व पुरुष वारकरी देहभान विसरून मग्न झाले.

दौडे माऊलीचा अश्व

जणू फिरते विश्व

असा रिंगण सोहळ्याचा सुखद अनुभव डोळ्यांत साठवून सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात ठेवून हा भक्तांचा महापूर वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.