Tue, Jul 16, 2019 00:21होमपेज › Solapur › ज्ञानेश्वर माऊली पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

ज्ञानेश्वर माऊली पालखीचे सोलापुरात आगमन

Published On: Jul 17 2018 1:35PM | Last Updated: Jul 17 2018 11:00PMनातेपुते : सुनील गजाकस

ध्यास हा जिवाला, पंढरीशी जावू । 
पंढरीचा राणा डोळे भरून पाहू ॥

या ओढीने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्याची सीमा पार करून मंगळवारी धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे सोलापूर जिल्ह्यात आला असून मंगळवारी रात्री नातेपुते येथे मुक्‍कामी विसावला आहे. 

पंढरीच्या ओढीने निघालेल्या वारकर्‍यांचे आणि पालखी सोहळ्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उत्साहात स्वागत करण्यात आले. 

विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाला भेटण्याच्या उत्कट ओढीने  ऊन-पावसाची तमा न बाळगता अलंकापुरीहून आलेल्या संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीसोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी अखंड हरिनाम घेत पंढरीकडे कूच करीत आहे. या सोहळ्याने  मंगळवारी (दि. 17) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे तोफांच्या सलामीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

सर्वात पुढे चौघडा, त्यामागे अश्‍व व 27 दिंड्या, त्यानंतर विविध फुलांनी सजवलेला माऊलींचा रथ आणि त्यामागे 250 पेक्षाही अधिक दिंड्यांचा दळभार टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत मोठ्या उत्साही व भक्‍तिमय वातावरणात धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आला. रथाला तोरणे, लड्या, गोंडे आदींची सजावट करण्यात आली होती.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर सरहद्दीवर  10.51  वाजता माऊलींच्या पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे पूजन केले.  तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप  पाटील व जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला निरोप दिला. संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास आ. हनुमंत डोळस, माजी आ. बबनराव पाचपुते परभणीचे खा. संजय जाधव, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, तहसीलदार बी.एस. माने, भाजप नेते उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते. संत ज्ञानेश्‍वर माऊलींची पालखी धर्मपुरी बंगला येथे विसावा घेऊन नातेपुतेकडे जिल्ह्यातील पहिल्या मुक्‍कामासाठी मार्गस्थ झाली.