सांगोला : तालुका प्रतिनिधी
आलेगाव गावचे (बाबरवाडी, ता. सांगोला) सुपुत्र भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर जालिंदर दादासो बाबर (वय 50) यांचे जम्मू-काश्मीर (उधमपूर) येथे कर्तव्यावर असताना शनिवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त आलेगाव येथे समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी पार्थिव आलेगाव येथे येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, सहा भाऊ, एक बहीण, पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
सन 1991 साली जालिंदर बाबर हे मराठा लाईफ इन्फंट्री 101 बटालियनमध्ये शिपाई (जवान) पदावर भरती झाले होते. त्यांची पदोन्नती होऊन सुभेदार मेजर म्हणून बढती मिळाली होती. सध्या ते जम्मू-काश्मीर (उधमपूर) येथे कर्तव्य बजावत होते. तर बंधू दिलीप बाबर यांची प्रवण व प्रदीप हे दोन मुले भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत आहेत.
दरम्यान, शनिवारी सायं. 7 च्या सुमारास त्यांच्या मित्राचा आलेगाव येथे फोन आला होता. त्यावेळी जालिंदर बाबर यांचे आई निलाबाई यांच्याबरोबर कौटुंबिक बोलणे झाले होते. दरम्यान रविवारी पहाटे 2 च्या सुमारास पत्नी माधवीला पती जालिंदर बाबर यांना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे कळविण्यात आले. माधवीने ही दुःखद घटना दुरध्वनीवरून आलेगाव येथे कळविले. घटनेचे वृत्त समजताच आलेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.