Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Solapur › सांगोला महसूल प्रशासनाचे वाळू उपशाकडे दुर्लक्ष

सांगोला महसूल प्रशासनाचे वाळू उपशाकडे दुर्लक्ष

Published On: Jun 02 2018 10:31PM | Last Updated: Jun 02 2018 9:07PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातून वाळू तस्करीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतानाच सामाजिक कार्याचा ठेका घेतलेे तथाकथित समाजसेवक वाळू चोरीकडे मात्र डोळेझाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

सांगोला तालुक्यातून माण, अफ्रुका, कोरडा या नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी राजरोसपणे होत आहे. या नदीपात्राच्या अखत्यारीत असणारे सर्वच महसूल कर्मचारी दिवसा वाळू चोरीकडे सावध असले तरी रात्री मात्र वाळू चोरीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. काही गावातील नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी वाळूचोरी विरोधात महसूल प्रशासनाला ग्रामसभेचा ठराव देवूनही काहीच फरक पडत नसल्याचे दिसत आहे. वाळू तस्कर (बडे मासे) व महसूल प्रशासनातील काही अधिकारी यांचे लांगेबांधे अधिक घट्ट असल्यामुळे तालुक्यातील सर्रास नदीपात्रातून वाळू चोरी होत असल्याचे या गावातील ग्रामस्थामधून बोलले जात आहे. रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर सारख्या वाहनातून रात्रभर वाळू चोरी करून नागरिकांना दिसून न येणार्‍या जागेमध्ये वाळूसाठा केला जातो. हे सर्व वाळूसाठे नदीलगतच्या गावामध्ये तसेच महसूल प्रशासनाने कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. वाळू तस्कर (बडे मासे) व महसूल अधिकारी, मध्यस्थ यामधील  साटेलोटे फिसकटले तरच एखाद्या वाळू चोरावर कारवाईचा बडगा उचलला जातो. अशी चर्चा आवारात ऐकावयास मिळते.  

तत्कालीन तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या कार्यकाळात तालुक्यातील तसेच अन्य तालुक्यातील वाळू तस्करावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात होती. त्यामुळे वाळू चोरींवर मोठ्या प्रमाणात लगाम लागला होता. तहसिलदार श्रीकांत पाटील हे रात्री-अपरात्री ग्रस्त घालून वाळू चोरावर कारवाई करीत होते. शेकडो वाळू चोरीच्या वाहनावर कारवाई केल्याने शासनाच्या महसुलात कोट्यावधी रूपयाची भर तर पडलीच. या उलट वाळू तस्कर वाळू चोरीचे धाडस करीत नव्हते. सध्या मात्र अशा वाळू तस्करावर कारवाईच होत नाही. यामळे वाळू चोरीचे पेव सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा वाळू चोरावर महसूल प्रशासन कारवाई करेल काय? असा प्रश्‍न नागरीकांतून उपस्थित केला जात आहे. 

पंचायत समितीच्या अनेक आमसभेत वाळू चोरीबद्दल शेतकर्‍यांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावेळी महसूल अधिकार्‍यांनी वाळू चोरांवर कारवाई करण्यात येईल, असे  उत्तर दिले. यानंतर अद्यापपर्यंत मोठ्या वाळू तस्करावर कारवाई केल्याचे दिसून आले नाही. तालुक्यातील प्रमुख तीन नद्यातून वारेमाप वाळू चोरीमुळे नदीपात्रात खड्डे पडलेमुळे नदीपात्राचे वाळवंटच झाले आहे. वरिष्ठांनी वाळू चोरीकडे दुर्लक्ष न करता वाळू तस्करावर कारवाई करून वाळू चोरी रोखावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील शेतकर्‍यामधून होत आहे.