Wed, Nov 21, 2018 21:30होमपेज › Solapur › गणपतराव देशमुखांच्या एका फोनने मिटला विद्यार्थीनीचा प्रश्न

गणपतराव देशमुखांच्या एका फोनने मिटला विद्यार्थीनीचा प्रश्न

Published On: Jan 20 2018 11:52PM | Last Updated: Jan 20 2018 11:52PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील आमदार गणपतराव देशमुख हे आपल्या साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीत ११ वेळा आमदार होण्यामागे या बाबीचाही मोठा वाटा आहे. नुकतेच एका विद्यार्थीनीने त्यांच्याकडे गावात बसचा थांबा करावा अशी मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून आमदार देशमुखांनी तसे पत्रही विद्यार्थीनीला पाठविले आहे. त्यामुळे परिसरात आमदार गणपतराव देशमुखांची कार्यशैली चर्चेचा विषय ठरली आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूरच्या प्रेरणा विष्‍णू गवळी या मुलीने आमदार देशमुख यांना मोहोळला कॉलेजला जाण्यासाठी गावात बस थांबत नसल्याबद्दल पत्र लिहले होते. याठिकाणाहून मोहोळला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्‍त आहे. त्यामुळे बसमध्ये जास्‍त गर्दी होते. तसेच काही विद्यार्थ्यांना जागाही मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते, अशा आशयाचे पत्र लिहले होते. तसेच या बाबत पाठपुरावा करून सकाळी ७ ते ८.१५ दरम्यान दुसर्‍या बसला थांबा करण्याची विनंती केली होती.


या पत्राची दखल घेऊन आमदार देशमुख यांनी पंढरपूर आगारप्रमुखांना फोन करून दुसर्‍या बसला थांबा देण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पेनुर येथे पंढरपूर-सोलापूर बस सकाळी ८ वाजता थांबणार आहे, असे आमदार देशमुख यांनी पत्राद्वारे प्रेरणा गवळी हिला कळविले. 

तसेच पत्रात आमदार देशमुख यांनी, विद्यार्थीनीने पत्र पाठविले तेव्‍हा अधिवेशनासाठी नागपुरात होतो. दुसरे पत्र मिळाल्यानंतर आगारप्रमुखांशी बोलून निर्णय झाल्याचे म्‍हटले आहे. 

आमदार देशमुखांची जन्‍मभूमी पेनूरच
आमदार गणपतराव देशमुख सांगोला विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. त्यांची कर्मभूमी सांगोलाच असली तरी त्यांची जन्‍मभूमी मोहोळ तालुक्यातील पेनूर हे गावच आहे.