Tue, Mar 26, 2019 22:20होमपेज › Solapur › पोलिस ठाण्याची डायरी इतिहासजमा!

पोलिस ठाण्याची डायरी इतिहासजमा!

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:14PMसांगली : अभिजित बसुगडे

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे कामकाज हायटेक होत आहे. आता जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात असणारी पारंपरिक  डायरी ( रजिस्टर) इतिहासजमा होत आहे. सर्वच ठाण्यांमध्ये आता ऑनलाईन डायरीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पोलिस ठाणी आता खर्‍या अर्थाने हायटेक बनली आहेत. 

अधीक्षक शर्मा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर  दलाच्या आधुनिकतेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याच संकल्पनेतून  सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 80 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे तीनही शहरांवर पोलिसांचा चोवीस तास वॉच आहे. तीनही शहरातील उपनगरांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियंत्रण पोलिस मुख्यालयातून करण्याचा शर्मा यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

पोलिस ठाण्यातील सर्वांत रटाळ  काम म्हणजे  डायरी लिहीणे. ते काम आता शर्मा यांच्या निर्णयामुळे सोपे बनले आहे. ठाण्यातील अंमलदारांकडे विविध नोंदींसाठी असणारी  डायरीच आता इतिहासजमा करण्यात आली आहे. या डायरीत करण्यात येणार्‍या नोंदी आता ऑनलाईन डायरीत करण्यात येत आहेत. यासाठी  प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन ऑपरेटरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे अंमलदारांसह अधिकार्‍यांचे काम अत्यंत सोपे बनले आहे. 

जुन्या डायरीत नोंद करण्यात येणार्‍या सर्व बाबी या ऑनलाईन डायरीत नोंद केल्या जात आहेत. अनेकदा खराब अक्षरांमुळे डायरीतील मजकूर समजून घेणे अधिकार्‍यांना कठीण जात होते. यासाठी नोंद करणार्‍या संबंधिताला बोलावून त्याचे स्पष्टीकरण घ्यावे लागत असे. अधिकार्‍यांचा तो त्रास आता वाचणार आहे. शिवाय ऑनलाईन डायरीत होणार्‍या नोंदी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी कोठेही पाहू शकणार आहेत.  त्यामुळे डायरीत होणार्‍या नोंदी तातडीने समजल्याने पुढील कार्यवाही करताना अधिकार्‍यांना सहजता येणार  आहे. ऑनलाईन डायरीमुळे जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणी हायटेक बनली आहेत.