होमपेज › Solapur › संदीप पवारचे खरे मारेकरी अटक करा

संदीप पवारचे खरे मारेकरी अटक करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि सर्व मारेकर्‍यांना तातडीने अटक करून  हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा,  संदीप पवार यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात यावे या मागण्यांसाठी वडार समाजाच्यावतीने प्रचंड मोठा मूकमोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा झाला. 

पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची गुढी पाडव्याच्या दिवशीच भर दुपारी ( 18 मार्च रोजी) गोळ्या घालून, कोयत्याने वार करून हत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण पंढरपूर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून 9 आरोपींना अटक केली असली तरी वडार समाजात असंतोष धूमसतच आहे. या प्रकरणातील संदीप अधटराव आणि विकी मोरे हे दोन संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 
या पार्श्‍वभूमीवर 2 एप्रिल रोजी (सोमवार) मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्यावतीने  या मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी  11 वाजता संदीप पवार यांच्या भादुले चौकातील घरापासून निघालेला हा मूकमोर्चा शांततेत पंढरपूर नगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोडमार्गे दुपारी 12 वाजता तहसीलदार कार्यालयावर येऊन धडकला.  उन्हाचा  प्रचंड तडाखा असला तरीही या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग होता तसेच लहान मुले, समाजातील ज्येष्ठ नागरिक, राजकीय, सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.  रणरणत्या उन्हात 5 हजारांहून जास्त  लोक या मोर्चात सामील झाले आहेत. तहसीलदार कार्यालयावर आल्यानंतर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे प्रमुख व नवी मुंबईतील शिवसेनेचे पक्षनेते विजय चौगुले, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना दिलीप धोत्रे यांनी संदीप पवार यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली, तर विजय चौगुले यांनी वडार समाजाचा न्यायव्यवस्थेवर, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्‍वास आहे. मात्र संदीप पवार यांच्या हत्येनंतर समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात असंतोष आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, त्यांना कडक शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, संदीप पवार यांच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जावे, अशा मागण्या केल्या. 

या मोर्चामध्ये  माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे, दगडू घोडके, नगरसेविका आणि मृत संदीप पवार यांच्या मातोश्री सुरेखा पवार, नगरसेविका स्वाती धोत्रे, नगरसेवक सुधीर धोत्रे,  लखन चौगुले, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे,  महादेव धोत्रे यांच्यासह वडार समाजातील हजारो लोक सहभागी होते. यावेळी मृत संदीप पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर मोर्चा शांततेत झाला. संपूर्ण मोर्चाच्या मार्गावर तसेच शहरात संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. मोर्चेकर्‍यांनी सर्व सहभागी लोकांना शांततेचे आवाहन केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मोर्चा होईपर्यंत शहरातील बाजारपेठेतील तसेच मोर्चाच्या मार्गावरील बहुतांश दुकाने बंद होती. मोर्चा संपल्यानंतर मात्र सर्व परिस्थिती सामान्य होऊन जनजीवन सुरळीत चालू झाले. 


  •