होमपेज › Solapur › संदीप पवार खून प्रकरणातील मुख्य संशयितांना अटक  

संदीप पवार खून प्रकरणातील मुख्य संशयितांना अटक  

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संदीप अधटराव आणि विकी मोरे, विशाल पवार या तिघांना गुरुवारी पोलिसांनी सांगोला येथे अटक केली. शुक्रवारी त्यांना मोक्का न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

नगरसेवक संदीप अधटराव यांचा 18 मार्च रोजी पंढरपुरात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून खून केला होता. यासंदर्भात संदीप पवार यांच्या मातोश्री नगरसेविका सुरेखा पवार यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यामध्ये संदीप अधटराव, विकी मोरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणाचा पोलिस शोध घेत असताना   पोलिसांनी भाजपचा जि.प.सदस्य गोपाळ अंकुशरावसह आजवर 24 आरोपींना अटक केली आहे. या खून प्रकरणातील आरोपींची वाढती संख्या आणि गंभीर बाबी उघड झाल्यानंतर पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीचे मोक्का कलम लावून सर्व आरोपींची चौकशी सुरू केली आहे.  मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित असलेले संदीप अधटराव आणि विकी मोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. तसेच विशाल पवार या अन्य एका संशयिताचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान हे तिन्ही आरोपी सांगोल्यात आल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास ताब्यात घेतले आणि मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्यानंतर तपास अधिकारी माळशिरसचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी तिन्ही आरोपींना पुणे येथे मोक्का न्यायालयापुढे शुक्रवारी हजर केले. यावेळी न्यायमूर्ती जे.टी. उत्पात यांनी तिन्ही आरोपींची रवानगी 18 जूनपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे.  दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे आता संपूर्ण खुनाचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.