Tue, Apr 23, 2019 19:59होमपेज › Solapur › जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासनाच्या जीवावर उठले

जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासनाच्या जीवावर उठले

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 07 2018 11:58PMसोलापूर : प्रतिनिधी

वाळूचा अधिकृत लिलाव झाला नसला तरी शहर व जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक चालू आहे. यांच्यावर महसूल, पोलिस प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू तस्करांची मुजोरी आणि गुंडगिरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी सांगोल्यात मंडल अधिकार्‍यावर गाडीतील इंधन काढून ते अंगावर टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. तर शुक्रवारी बार्शीमधील वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या अंगावर टिप्पर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला. या घटनांमुळे पोलिस व महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून वाळू तस्करीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

मंडल अधिकारी दत्तात्रय मल्लिकार्जुन कांबळे (वय 50 रा. जुना मेडशिंगी रोड, सांगोला) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नितीन अरूण पाटील (वय 31), दादासाहेब रामचंद्र बागल (वय 42), संभाजी दादासाहेब काशीद (वय 28, सर्व रा. सोनंद, जुना मेडशिंगी रोड, ता. सांगोला) या तिघांवर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी सायंकाळाच्या सुमारास हणमंतगाव व लोणविरे गावाचे काशीद वस्तीवरील रोडवर मंडल अधिकारी कांबळे काही कर्मचार्‍यांबरोबर अवैध वाळू वाहतूक वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कर्तव्य बजावत होते. यावेळी नितीन पाटील हा विनानंबरचा ट्रॅक्टरला डंपिंग जोडून वाळूची चोरटी वाहतूक करताना मिळून आला. ट्रॅक्टरवर कारवाई करुन तहसील कार्यालयाला ट्रॅक्टर घेऊन जात असताना दादासाहेब आणि संभाजी व इतर एक यांनी मोटारसायकलवर येऊन तिघांनी मिळून मंडल अधिकार्‍यास धमकी देण्यास सुरूवात केली. तुम्ही टॅक्टर कसे घेऊन जाता तेच बघतो असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करुन आरोपी संभाजीने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल ट्रॅक्टर आणि कर्मचार्‍यांच्या अंगावर टाकून तुम्हाला ट्रॅक्टरसह जाळून टाकतो, अशी धमकी देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसरीकडे वैरागमध्ये पोलिसावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केल्याने तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक योगेश अर्जुन मंडलिक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन टिप्पर क्रमांक एमएच 13 ए एक्स 3735 चा चालक, सिद्धेश्‍वर भारत गायकवाड (रा. मिर्झनपूर, ता. बार्शी) आणि एका अनोळख्या व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्यावेळी कासारी भांडेगाव चौकात कासारी येथे चोरटी वाळू वाहतूक करीत, टिप्पर भरधाव व वेडीवाकडे वळणे घेत चालवत असल्याने पोलिसांनी अडविले असता पोलिसांनाच दमदाटी करुन, अंगाला झटापट करुन वाळूने भरलेला टिप्पर पोलिसांच्या अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या भीतीने पोलिसांनी टिप्पर सोडून दिला. परत आमच्या वाळूचा टिप्पर तुम्ही अडवायचा नाही, तुम्ही अडविणारे कोण, असे म्हणून दमदाटी करुन वाळू घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परवाना नसताना चोरट्यारितीने वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी कोर्सेगाव येथे टिप्पर (एमएच 13 आर 4791), विनानंबरचा दोन निळ्या रंगाचा ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजता एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील सुनीलनगर येथे वाळू चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात टिप्परसह 3 ब्रॉस वाळू असा 3 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पीडिताचाच घूमजाव; अखेर संजयवर गुन्हा दाखल 
अधिकृत लिलाव नसतानाही चोरटी वाळू होत असून हल्ल्याचे प्रमाण वाढले आहेत. अशाचप्रकारे पंधरा दिवसांपूर्वी शिवानंद रामचंद्र टेंगळे (वय 23, रा. कोर्सेगाव, ता. अक्कलकोट) याने वडकबाळ टोलनाक्याच्यापुढे चोरटी वाहतूक होत असताना गाडी अडविली. यावेळी संजय चडचण आणि इतर लोकांनी तलवारीने टेंगळेच्या उजव्या हातावर मारल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी पत्नी कविता टेंगळे यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र याबाबत विजापूर नाका, तालुका पोलिस ठाणे, मंद्रुप पोलिस ठाणे असा कोठेच गुन्हा दाखल झाला नाही. उपचार घेत असताना विचारले असता मला आता काय बोलायचे नसल्याचे शिवानंदने सांगितले. त्यानंतर त्याने घूमजाव केला. आता परत शुक्रवारी संजय चडचण नामक व्यक्तीवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.