होमपेज › Solapur › सोलापुरात ओबीसी नेत्यांना काळे फासले

सोलापुरात ओबीसी नेत्यांना काळे फासले

Published On: May 04 2018 3:20PM | Last Updated: May 04 2018 5:04PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाला निवेदन देण्यासाठी जाताना ओबीसी नेते शंकरराव लिंगे व अ‍ॅड. राजन दीक्षित यांच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचा प्रकार सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी घडला.

मागासवर्ग आयोगाचे सदस्य व अधिकारी सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल झाले होते. आयोगाला मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात निवेदने देण्यात येत होती. ओबीसी नेते शंकरराव लिंगे व अ‍ॅड. राजन दीक्षित हेसुद्धा शासकीय विश्रामगृहात आले   होते. मराठा समाजाला आरक्षण  देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, असे निवेदन ते देणार होते.दरम्यान, माउली पवार, शहाजी पवार, सोमनाथ राऊत आदी मराठा नेते व कार्यकर्ते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान  संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लिंगे व अ‍ॅड. दीक्षित यांना धक्‍काबुक्‍की करत काळे फासले व कपडे फाडले.

निवेदने देण्यासाठी गर्दी

दरम्यान, शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास  मराठा आरक्षण आयोग सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात जनसुनावणीसाठी दाखल होताच  सकल मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते जमले होते. यापूर्वी नियोजन केल्याप्रमाणे आयोगाला एक लाख निवेदने देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता.  आयोगातील डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. रामभाऊ करपे व सचिव ए.डी. देशमुख यांच्यासमोर मराठा आरक्षण जनसुनावणी सुरू होती.

त्यावेळी ओबीसी नेते शंकरराव लिंगे व अ‍ॅड. राजन दीक्षित आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत शासकीय विश्रामगृहात आले. त्यावेळी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी लिंगे यांना हटकले. त्यावेळी शंकर लिंगे यांनी माऊली पवार यांना सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीमधील आरक्षण कमी होता कामा नये, असे निवेदन देण्यास आलो  असल्याचे सांगितले. दरम्यान, मराठा  समाजातील नेत्यांनी तुम्हाला जे काही निवेदन द्यायचे आहे ते मागासवर्गीय आयोगाच्या मुख्य कार्यालयात जाऊन द्या, असे लिंगे यांना सूचविले. परंतु कोणीही ऐकायला तयार नव्हते. भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनीसुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 

शेवटी संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत लिंगे यांच्याशी वाद घालत काळे फासले. बघताबघता लिंगे यांना खाली पाडून त्यांचे कपडे फाडले. अ‍ॅड. राजन दीक्षित यांनाही किरकोळ मारहाण करत धक्‍काबुक्‍की करण्यात आली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी ताबडतोब जादा कुमक मागवून लिंगे व दीक्षित यांना गर्दीतून बाहेर काढले व सदर बझार पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

या घटनेनंतर शासकीय विश्रामगृहात काहीकाळ गोंधळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तत्काळ पोलिस बंदोबस्त वाढवला. दिवसभर शासकीय विश्रामगृहाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.

दोन लाख निवेदने प्राप्त

मराठा आरक्षणाच्या जनसुनावणीत तीन सदस्यीय मागासवर्गीय आयोगाला सोलापुरातून दोन लाखांवर निवेदने प्राप्त झाली असल्याची माहिती आयोगातील सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितली. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झालेल्या जनसुनावणीत सर्वात जास्त निवेदने सोलापूर शहर व जिल्ह्यातून आली. डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. रामभाऊ करपे व सचिव ए. डी. देशमुख यांच्यासमोर मराठा आरक्षण जनसुनावणी झाली. 

राज्य शासनाने नेमलेल्या मराठा आरक्षण मागासवर्गीय आयोगाने शुक्रवारी सकाळी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात जनसुनावणी घेतली. जनसुनावणीसोबत मराठा समाजबांधवांनी निवेदने देत आपल्या समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक कैफियत मांडली. निवेदने देण्यासाठी आलेल्या सर्वांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न आयोगाने केला.

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने 10 सदस्यीय आयोग नेमला आहे. त्यामधून तीन सदस्यीय टीम गुरुवारी रात्री सोलापुरात दाखल झाली होती. शुक्रवारी सकाळी 11 ते 6 यावेळेत शहर व जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी शासकीय विश्रामगृहात येऊन सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक व्यथा मांडल्या. मराठा समाज कशाप्रकारे जीवन जगत आहे याची सविस्तर माहिती सांगितली.

सोलापुरात 23 एप्रिल रोजी  सकल मराठा समाजाच्यावतीने तातडीची बैठक घेण्यात आली होती. 4 मे रोजी येणार्‍या मागासवर्गीय आयोगाला लाखोंच्या संख्येने निवेदने देण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणीवेळी लाखोंच्या संख्येने निवेदने देण्यात आली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतून व गाव, वस्त्यावाड्यांतून मराठाबांधव निवेदन देण्यासाठी आले होते. ग्रामपंचायतींनी  आपल्या पंचांना घेत ठराव करत तो ठराव सादर केला. शहरातील वेगवेगळ्या महिला बचत गटांनी व महिला संघटनांनी निवेदन दिले. 

राज्य शासनाने नेमलेल्या दहा सदस्यीय टीमचे मराठा आरक्षणसंदर्भात आयोगाचे कामकाज पूर्ण वेगाने केले जात असल्याची माहिती डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितली. नांदेड, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, नागपूर आदी जिल्ह्यांतून जनसुनावणी घेत सोलापुरात आलो व सोलापुरातून सर्वात जास्त सुमारे दोन लाख निवेदने प्राप्त झाली आहेत. बार्शी तालुक्यातून सुमारे 23 हजार निवेदने मिळाली.

ओबीसीमध्ये कोणत्या समाजाला घ्यायचे व कोणाला नाकारायचे हा राज्य शासनाचा विषय आहे. एस.सी. व एस.टी.संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला असल्याची माहिती जनसुनवाणी घेतलेल्या आयोगाने सांगितले. मराठा आरक्षण देताना सरकारी आकडेवारी, जनसुनावणी, सर्व्हे, ऐतिहासिक पुरावे व कोर्टाचे निवाडे या  सर्वांचा अभ्यास करुन आरक्षण देण्यात येणार आहे.

मराठा सामाजाच्या आरक्षणाच्या सर्व्हेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही संस्थांची नेमणूक केली  आहे. त्यामध्ये  मराठवाड्यासाठी  छत्रपती शिवाजी प्रबोधन संस्था, औरंगाबाद, कोकणसाठी रामभाऊ माळगे, पूर्ण विदर्भासाठी शारदा कन्स्लटन्सी, उत्तर महाराष्ट्रासाठी गुरुकृपा विकास संस्था, व पश्‍चिम महाराष्ट्रासाठी गोखले इन्स्टिट्यूट या संस्था नेमण्यात आल्या आहेत.

सोलापुरात झालेल्या जनसुनावणीत मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवेदने स्वीकारण्यात आली. सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले व सर्वात शेवटी सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.