Mon, Mar 25, 2019 05:05
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या 100 जागा लढवणार

संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या 100 जागा लढवणार

Published On: May 20 2018 10:43AM | Last Updated: May 20 2018 10:43AMपंढरपूर : प्रतिनिधी

राज्यातील भाजप सरकारविषयी सर्वच समाज  घटक तीव्र नाराज आहेत आणि काँग्रेस- राष्ट्रवादीला लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे  समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा  पर्याय खुला ठेवत आगामी विधानसभा निवडणूकीत संभाजी ब्रिगेड 100 जागा लढवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी  पत्रकारांशी बोलताना दिली.

संघटना बांधणी आणि सोलापूर जिल्ह्यातील  कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खेडेकर हे दोन  दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर  आले  आहेत. पंढरपूर येथे शनिवारी त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला यावेळी संभाजी  ब्रिगेडचे धोरण हे शंभर टक्के राजकारण  आणि शंभर टक्के समाजकारण असल्याचे  स्पष्ट केले. यावेळी पुढे बोलताना खेडेकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेडला जिल्हा परिषद,  पंचायत समिती निवडणुकीत 2 लाख 75  हजार मते मिळाली होती. तसेच 127  ग्रामपंचायतीमध्ये संभाजी ब्रिगेडचे सरपंच  निवडून आले आहेत. राज्यात आजवर कधी नव्हे ते सर्व जातीच्या समाजांचे मोर्चे निघत आहेत,  व्यवसायिक, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी या सरकारवर  नाराज आहेत.  राज्यातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

शेतकर्‍यांची  परिस्थीती दयनीय झालेली आहे. साखरेचा प्रश्‍न गंभीर झाला असून साखर  कारखानदारी मोडून काढायचा सरकारचा हेतू दिसून  येत आहे. शहरी  आणि ग्रामीण असा भेद करून हे सरकार आपली शहरी व्होट बँक बनवत  आहे. भीमा- कोरेगाव, औरंगबाद येथील दंगली सरकार पुरस्कृत आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या शेळ्यासुद्धा आता चोरीस जाऊ लागल्या आहेत अशा  प्रकारची राज्यात अनागोंदी माजलेली आहे. मात्र, तरीही  भाजप सरकारवर  नाराज झालेले लोक लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील असे नाही.  शेतकरी, युवक, नोकरदार, व्यवसायिकांचे प्रश्‍न घेऊन ब्रिगेड पुढे जाणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने  आगामी विधानसभा निवडणुकीत  100 जागा लढवण्याचे ठरवले आहे. त्याअनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू आहे.  अनेक समविचारी पक्ष, संघटनांकडून आघाडीसाठी निरोप आलेले आहेत.  भविष्यात त्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी खेडेकर म्हणाले.

संभाजी ब्रिगेडमधील फुटीसंदर्भात बोलताना खेडेकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेडमुळे ज्या राजकीय पक्षांना फायदा होत होता त्यांना ब्रिगेड स्वतंत्र पक्ष झाल्यानंतर नुकसान झाले असते. त्यामुळे संभाजी ब्रिगेडमध्ये फुट पाडून ताकद कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. इतिहासात मातृ संघटनेत फुट पाडून कुठलीही संघटना आणि नेतृत्व मोठे झाल्याचा इतिहास नाही.  त्यामुळे ब्रिगेडमध्ये फुट पाडण्याचे जे प्रयत्न करीत आहेत त्यांनी ते प्रयत्न  सोडून द्यावेत. अन्यथा त्यांचा बंदोबस्त केला जाईल असाही इशारा खेडेकर  यांनी यावेळी दिला. सिंदखेड राजा येथे राज्य सरकारकडून 3 वर्षात काहीही विकास काम झालेले नाही. तुळापूर येथे ब्रिगेडच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचेही खेडेकर यावेळी म्हणाले.

यावेळी किरण घाडगे, सचिन जगताप,नगरसेवक प्रशांत शिंदे, रणजित जगताप, बाळासाहेब बागल, सतिश शिंदे, रोहित मोरे, दादा बोडके,  संदीप पाटील, बालाजी अटकळे, पिंटू अटकळे, सचिन कोले, अजित दुपडे, आकाश मांडवे, स्वप्नील गायकवाड, अनिकेत मेटकरी, आकाश शिंदे, अजित शिंदे, संतोष बारले आदी उपस्थित होते.