Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Solapur › भिडेंच्या वक्तव्यावर महाराज मंडळी गप्प

भिडेंच्या वक्तव्यावर महाराज मंडळी गप्प

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 9:38PMपंढरपूर : नवनाथ पोरे

संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षाही मनू एक पाऊल पुढे होता. असे वक्तव्य करून मनोहर भिडे यांनी विषमतावादी मनूचे उदात्तीकरण केले. त्याचबरोबर समतावादी संतांना भिडे यांनी कमी लेखले आहे. संभाजी भिडे यांनी एवढे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी मात्र गप्प बसल्यामुळे भिडे यांच्या वक्तव्याला त्यांची संमती आहे काय अशी विचारणा सर्वसामान्य वारकर्‍यांतून केली जात आहे. दरम्यान पंढरपूर शहरात विविध सामाजिक संघटनांनी भिडे यांच्या पुतळ्याचे तसेच मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन केले आणि संभाजी भिडे यांचा निषेध केला. तसेच आषाढी यात्रेच्यावेळी येणार्‍या मुख्यमंत्र्यांना याविषयी जाब विचारण्याचा इशारा दिला आहे. 

वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून विविध सामाजिक प्रश्‍नावर व्यक्त होत आहेत. अनेक वेळा या मंडळींनी मार्गावरच पालखी सोहळे रोखून धरले आणि आंदोलने केली. गेल्या वर्षी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड झाल्यानंतर याच महाराज मंडळींनी पंढरपुरात आल्यानंतर माउलींचा पालखी सोहळा रोखून धरला होता. सुमारे 1 तास आंदोलन केल्यानंतर पालखी सोहळा पंढरपूर शहरात प्रवेशकरता झाला. त्यानंतर कालांतराने प्रमुख महाराज मंडळींच्या मंदिर समितीवर नियुक्त्या करण्यात आल्या. मंदिर समितीच्या कारभारावर वॉच ठेवणारी एक समांतर सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली. थेट मंदिर समिती कायद्यात बदल करीत ह.भ.प. औसेकर महाराज यांना तर मंदिर समितीचे सहअध्यक्षपद बहाल केले. वारकर्‍यांच्या प्रश्‍नावर, बर्‍याच वेळा संप्रदायाच्या बाहेर जाऊन प्रकाशित साहित्य, कथा कादंबर्‍यांच्या विरोधातही वारकर्‍यांच्या पुढार्‍यांनी आंदोलने केली आहेत.  

या पार्श्‍वभूमीवर  वारकरी संप्रदायातील शिरोमणी असलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य पुण्यात केले. विषमतावादी म्हणून ज्या मनू ला भारतीय व्यवस्थेने नाकारले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनूस्मृतीचे दहन केले. त्याच मनुला समतावादी संतांपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे संभाजी भिडे प्रमाणपत्र देतात. वारकरी संप्रदायाचा पायाच समतावादी आहे तरीही विषमतावादी विचाराच्या मनुचे उदात्तीकरण या महाराज मंडळींना आक्षेपार्ह वाटत नाही. संभाजी भिडेंचा साधा निषेधही अद्यापर्यंत या महाराज मंडळींच्या एखाद्या संघटनेने केलेला नाही. यावरून या महाराज मंडळींचे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मूक समर्थन आहे काय अशी विचारणा सामान्य वारकर्‍यांतून केली जात आहे. त्याचवेळी राज्यातील पुरोगामी संघटना आणि विचारवंतांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांनी माफी मागावी अशीही मागणी केली आहे. पंढरपुरात सर्व सामाजिक संघटनांच्यावतीने नुकतेच संभाजी  भिडे आणि प्रतीकात्मरित्या मनूस्मृतीचेही दहन छत्रपती शिवाजी चौकात करण्यात आले. संभाजी भिडे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा आषाढी यात्रेच्यावेळी येणार्‍या मुख्यमंत्र्यांना जाब विचारू असाही इशरा या संघटनांनी दिला आहे.