Sun, May 26, 2019 19:42होमपेज › Solapur › पंढरपूरच्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला समाजभूषण पुरस्कार जाहीर

पंढरपूरच्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला समाजभूषण पुरस्कार जाहीर

Published On: Apr 13 2018 10:06PM | Last Updated: Apr 13 2018 10:06PMपंढरपूर : प्रतिनिधी

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति व संस्थांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 2017-18 वर्षाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, पंढरपूरला यंदाचा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी याबाबत घोषणा केली आहे.

अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतो. सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तिंची निवड समितीने केली आहे.

सन 2017-18 या वर्षाचा कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी भंडारा जिल्ह्यातील मीरा संतोष भट (रा. पुष्पानंद, विनोबा भावे नगर, तुमसर) यांची तर संस्थेचा पुरस्कार बीड जिल्ह्यातील जागर प्रतिष्ठान (पाडळसिंघी, नगररोड, बीड) या संस्थेला जाहीर झाला आहे.

सन 2017-18 या वर्षाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी विविध जिल्ह्यातील 61 व्यक्तिंची तर सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे. 

निवड झालेल्या संस्थांची नावे – जनसेवा फाउंडेशन, पुणे, आरोग्य प्रबोधिनी, गडचिरोली, इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, पंढरपूर, कोल्हापुरी लेदर चप्पल उत्पादक व विक्रेता संस्था, कोल्हापूर आणि परिवर्तन विद्याप्रसारक संस्था, धुळे. निवड झालेल्या व्यक्ति व संस्थांना पुरस्काराचे वितरण एका भव्य कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती श्री. बडोले यांनी दिली.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, पंढरपूर ही संस्था नगरसेवक डी. राज सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून प्रतिष्ठानकडून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. या कार्याची दखल घेवून शासनाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल सर्वगोड यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.