Sat, Mar 23, 2019 12:27होमपेज › Solapur › समाधान आवताडे यांची राजकीय साखर पेरणी; मंगळवेढ्यात राजकीय लगबगी वाढल्या

समाधान आवताडे यांची राजकीय साखर पेरणी; मंगळवेढ्यात राजकीय लगबगी वाढल्या

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:23PMमंगळवेढा :  प्रा. सचिन इंगळे

थेट जनसंपर्क  आणि तालुक्याच्या सर्व सहकारी संस्था ताब्यात असलेल्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना राजकीय पक्षाच्या अस्तिवापेक्षा त्यांचे  स्वयंभू असणे हीच त्यांची मोठी ताकद आहे. 

सध्या त्यांचा वावरदेखील जिल्ह्यातील बिगर राजकीय गटासोबत  असल्याने शिवसेनेच्या त्यांच्या अस्तित्वाला काहीसा अर्थ राहत नाही. संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात दहा रुपये किलोने सभासदांना साखर देण्याचा निर्णय घेत राजकीय प्रगल्भता दाखवत समाधान आवताडे यांनी विधानसभा निवडणुकीत मी पण तयारीला लागलो आहे, हे दाखवून देत विरोधकांना इशारा दिल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

नैसर्गिक दुष्काळी मंगळवेढा तालुक्याला राजकीय दुष्काळ मात्र कधीही पडत नाही. मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने पंढरपूरचे राजकीय धुरंधर मंगळवेढ्यात डेरेदाखल झाले. मात्र स्थानिक पातळीवर राजकीय वर्चस्व असणारे नेते या मोठ्या ताकदवान नेत्यापुढे खुजे ठरले. याचे कारण आवताडे यांचा पंढरपूर भागात नसलेला जनसंपर्क आहे.  शिवसेनेतून समाधान आवताडे यांनी आपले नशीब आजमावले. मंगळवेढ्यात त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला, पण पंढरपूर तालुक्यातून त्यांना अत्यल्प मतदान झाले. 

मंगळवेढा तालुक्यात आवताडे हे स्वयंभू नेते आहेत. त्यांना राजकीय पक्षाच्या लेबलचा फायदा किती होतो, यापेक्षा त्यांचे तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर एकहाती वर्चस्व आहे, याचाच फायदा त्यांना आगामी काळात विधानसभा निवडणुकीत होणार आहे.  गेल्या वर्षभरात त्यांनी पंढरपुरात जास्तीचे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्याकडे पंढरपूरात नेते जास्त नसले तरी तळागाळातील वंचित कार्यकर्त्यांना ते सोबत घेत आहेत. 

गेल्या दोन वर्षांपूर्वी संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. भारत भालके यांच्या आघाडीचा पराभव करत सभासदांना पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करण्याचे अभिवचन देण्यात आले होते. आवताडे यांनी ते आजवर पाळले असून दिवाळीपासून सभासदांना दहा रुपये किलो दराने साखर उपलब्ध होणार असून हा निर्णय सभासदांना दिलासा देणारा आहे. सध्या तालुक्यात आ. भालके यांनी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले आहे. आ. परिचारक यांनी वाढदिवस साजरा करायचा टाळले असले तरी मंगळवेढ्यात त्यांच्या संस्थांनी अनेक कार्यक्रम घेतले.

 जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करून तालुक्यातील दुर्लक्षित असलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर आवताडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या पंचायत समिती, जि.प. सदस्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवत जास्तीत जास्त निधी आणि योजना आणण्यासाठी प्रेरित करत आहेेेत. पंढरपूरात संपर्क कार्यालय सुरू  करणार आहेत. सध्या आ. भालके वगळता इतर संभाव्य उमेदवारांची तयारी ही विधानसभेसाठी सुरू आहे. मात्र कोणत्या पक्षाची झुल अंगावर घालायची, याबाबत मात्र अनिश्‍चितता दिसत आहे.