Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Solapur › शिवाजी चौकात सकल मराठा समाजाचे आज चक्‍काजाम आंदोलन

शिवाजी चौकात सकल मराठा समाजाचे आज चक्‍काजाम आंदोलन

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 20 2018 10:56PMसोलापूर : प्रतिनिधी  

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनाने मेगा भरती म्हणून ज्या 36 हजार जागांची वर्षाच्या अखेरपर्यंत नोकरभरती काढली आहे ती  थांबविण्यात यावी  तसेच विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवार, दि.21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी चौकात चक्‍काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माऊली पवार यांनी दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी कर्ज वाटप होणार होते. त्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत. फक्‍त सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्ज मागणी 1 हजार अर्ज आले असून वाटप फक्‍त तीन लोकांनाच झाले आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत बोगस केसेसचे प्रमाण वाढले आहे. ज्या केसेसमधून मराठा समाजाला ब्लॅकमेल केले जाते व राज्यात याला सगळ्यात जास्त बळी हा मराठा समाज आहे .त्याकरिता जिल्हास्तरीय कमिटी नेमण्याचे शासनाने आश्‍वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही.

आर्थिक दुर्बल घटकातील मागास विद्यार्थ्यांना ज्याचे उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे त्यांना ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सुविधा देण्याचे सरकारने कबूल केले होते. परंतु याची अंमलबजावणी होताना महाराष्ट्रात अजून तरी दिसत नाही. त्यासाठी आंदोलने करावयाची वेळ समाजावर आली आहे. 

शहराच्या ठिकाणी मराठा मुलींकरिता हॉस्टेलसाठी दोन एकर जागा व बांधकामाकरिता पाच कोटी रुपये निधी देण्याचे शासनाने जाहीर केले. सोलापूर जिल्ह्याची हॉस्टेलची फाईल शासनाकडे मागील एक वर्षापासून मंजूर होऊन पडून आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. 

दीड लाख रुपयांची कर्जमाफी फार कमी शेतकर्‍यांना मिळाली. परंतु नव्याने शेतकर्‍यांना कर्ज मिळत नाही. त्याचा रोष आज सर्व शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळे समाजामध्ये व खास करून शेतकर्‍यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड संतापाची भावना आहे.

 शेतकरी हमीभावामध्ये ज्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ऊस घातला होता त्यांना अजूनही फरकाची रक्‍कम दिली जात नाही. दुधाची अवस्था भाव नसल्यामुळे तो आतबट्ट्याचा धंदा करत आहे व शेतीमालाला कोणत्याच प्रकारे हमीभाव मिळत नाही. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असणारा मराठा समाज हा शेतकरी आहे. त्यामुळे त्याचा कधी उद्रेक होईल, हे सांगणे कठीण आहे.

 वरील सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या असे शासन म्हणते. परंतु याची कुठेच अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने आज समाजावर जागरण-गोंधळ घालून, आंदोलन करून व मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या महापूजेला विरोध मराठा समाज करत आहे . या मागण्यांची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची तत्परता शासनाने दाखवावी अन्यथा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला मराठा समाजाकडून त्यांचा घोर अवमान झाल्यामुळे कोठेतरी गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होईल, असा इशाराही माऊली पवार यांनी दिला आहे.